अहमदाबाद : पहिल्यांदाच उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळेच आयपीएलमध्ये यावर्षी नव्या संघानेच राज्य केल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पंड्याने कर्णधाराला साजेसा अष्टपैलू खेळ केला आणि गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. हार्दिकच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानला गुजरातपुढे विजयासाठी १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. पण गुजरातने या आव्हानाचा सात विकेट्स राखत यशस्वी पाठलाग केला आणि आयपीएलचा चषक उंचावला. राजस्थानचे १३१ धावांचे माफक आव्हान वाटत असले तरी गुजरातला यावेळी चांगली सुरुवात करता आली नाही. कारण डावाच्या दुसऱ्याच षटकात राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने गुजरातचा सलामीवीर वृद्धिमान साहाला पाच धावांवर बाद केले. त्यानंतर पाचव्या षटकात ट्रेंट बोल्टने गुजरातच्या मॅथ्यू वेडला ८ धावांवर बाद केले. गुजरातची यावेळी २ बाद २३ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला आणि त्यानंतर सामन्याचे रुप बदलल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक आणि शुभमन गिल यांनी यावेळी दमदार फटकेबाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला आणि त्यांनी संघाला विजयासमीप पोहोचवले. गिलला पहिल्याच षटकात युजवेंद चहलने जीवदान दिले होते आणि तेच राजस्थानला भारी पडल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक यावेळी ३४ धावांवर बाद झाला आणि सामन्यात पुन्हा रंगत भरली. पण गिलने यावेळी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानने यावेळी नाणेफेक जिंकत फलंदाजी स्विकारली, पण कर्णधार संजू सॅमसनचा हा निर्णय चुकल्याचे पाहायला मिळाले. सामन्याच्या सुरूवातीला सलामिवीर यशस्वी जयस्वालने चांगली सुरूवात केली. मात्र, तो १६ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि जाॅस बटलरची जोडी मैदानात होती. परंतू, संजू सॅमसनला देखील यावेळी चांगली खेळी करता आली नाही. त्याने यावेळी ११ चेंडूत केवळ १४ धावा केल्या. त्यानंतर यंदाची आयपीएल गाजवणारा जाॅस बटलरने आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली. मात्र, तो देखील जास्त काळ मैदानावर टिकू शकला नाही. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या गोलंदाजीत बटलरला चालतं केलं. बटलर आजच्या सामन्यात चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. त्याने यावेळी ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. बटलरने तंबूत जाताना आपले हेल्मेट फेकत संताप व्यक्त केला. बटलर बाद झाल्यानंतर राजस्थानचा संघ पत्त्यांच्या बंगल्यासारखा गडगडला. त्यामुळेच राजस्थानच्या संघाला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांना गुजरातपुढे १३१ धावांचे माफक आव्हान ठेवता आले. हार्दिक पंड्या आणि रशिद खान यांनी अचूक आणि भेदक मारा करत राजस्थानच्या धावसंख्येला लगाम लावला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RwnrJvB
No comments:
Post a Comment