पुणे : कर्णधार बदलला आणि चेन्नईच्या संघाचे नशिबही बदलल्याचे पाहायला मिळाले. गेल्या आठ सामन्यांमध्ये चेन्नईला फक्त दोनच विजय मिळवता आले होते. त्याचबरोबर गेल्या सामन्यात त्यांना पंजाब किंग्सकडून पराभव पत्करावा लागला होता. पण धोनीने संघाचे नेतृत्व स्विकारले आणि पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या संघाला आपल्या नेतृत्वाखाली विजय मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराज गायकवाडच्या ९९ आणि डेव्हन कॉनवेच्या नाबाद ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादपुढे २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला ठराविक फरकाने एकामागून एक धक्के बसत गेले आणि त्यांच्या हातून सामना निसटला. दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईच्या संघाने हा सामना १३ धावांनी जिंकला. चेन्नईच्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला अभिषेक वर्माने भन्नाट सुरुवात करून दिली. पण त्याला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही त्याेन २४ चेंडूंत ३९ धावा केल्या. वर्मा आऊट झाल्यावर राहुल त्रिपाठी फलंदाजीला आला. राहुलकडून संघाला यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर काही काळ कर्णधार केन विल्यमसन आणि एडन मार्करम यांची जोडी जमली होती. पण मार्करम यावेळी १७ धावांवर बाद झाला आणि हैदराबादला तिसरा धक्का बसला. यावेळी हैदराबादची भिस्त केनवर होती. पण अर्धशतकासमीप आलेला केन मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि आता हैदराबादचा संघ हा सामना जिंकू शकत नाही, याचे स्पष्ट संकेत मिळाले. केनने यावेळी ३७ चेंडूंत ४७ धावांची खेळी साकारली. तत्पूर्वी, चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीवीरांनी धडाकेहाज सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नईला दमदार सुरुवात करू दिली. पण त्याचे शतक यावेळी फक्त एकाच धावेने हुकले. ऋतुराजने यावेळी ५७ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ९९ धावांची खेळी साकारली. ऋतुराज बाद झाला असला तरी कॉनवे मात्र दमदार फटकेबाजी करत होता. कॉनवेने यावेळी ५५ चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ८५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना २०२ धावा करता आल्या. महेंद्रसिंग धोनी यावेळी चक्क तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आल्याचे पाहायला मिळाले. पण अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करताना तो आठ धावांवर बाद झाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/N8Bw4Pt
No comments:
Post a Comment