कोलकाता : पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात पोलिसांनी शनिवारी रात्री झारखंडच्या 3 आमदारांकडून मोठी रोकड जप्त केली असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी रक्कम मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या असल्याची माहिती आहे. हावडा शहर पोलिसांच्या दक्षिण डीसीपी प्रतीक्षा झाखरिया यांनी झारखंड काँग्रेसचे आमदार राजेश कछाप, नमन विक्सेल कोंगारी आणि इरफान अन्सारी हे प्रवास करत असलेल्या कारमध्ये ही रक्कम सापडल्याचा दावा केला आहे. प्रतीक्षा झाखरिया यांनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती दिली. पंचला पोलीस स्टेशन क्षेत्रातील रानीहाटी येथे राष्ट्रीय महामार्ग-16 वर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली त्यामध्ये झारखंडचे तीन आमदार प्रवास करत होते. या कारमध्ये मोठी रोकड आढळून आली असून पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. हावडा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक स्वाती भंगालिया यांनी या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचं सांगितलं. आता हा पैसा कुठून आला आणि कुठे नेला जात होता, याबाबत आमदारांकडे चौकशी केली जात आहे. इरफान अन्सारी जामतारा येथून आमदार आहेत, तर राजेश कछाप हे रांचीमधील खिजरी येथून आमदार आहेत आणि नमन कोंगारी हे सिमडेगा येथील कोलेबिरा येथून आमदार आहेत. आमदारांकडून रोख रक्कम जप्त केल्यानंतर, टीएमसीने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ रिट्विट केला आहे. धक्कादायक! कारमधून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. झारखंडच्या काँग्रेस आमदारांना हावडा येथे थांबवण्यात आले आहे. ईडी काही निवडक लोकांवरच कारवाई करत आहे का, असा सवाल टीएमसीने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून येत आहे. पश्चिम बंगालचे माजी उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडे मोठी रक्कम आढळली होती. त्यांच्यावर एसएससी घोटळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अर्पिता मुखर्जीकडे जवळपास ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम आढळून आली होती. ईडीनं अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3VzInwa
No comments:
Post a Comment