म.टा. प्रतिनिधी, नागपुरात वास्तव्य केलेले आणि शहराशी जवळचे संबंध असलेले देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचे भावनिक रूप नागपूरकरांनी शनिवारी अनुभवले. शहरातील आठवणींना उजाळा देताना आणि शहरात झालेल्या सत्काराला उत्तर देताना त्यांचा कंठ दाटून आला. प्रसिद्ध कवी आणि लेखक रुडियार्ड किपलिंग यांच्या कवितेतील ‘इट इज नॉट व्हाट यू हॅव्ह कव्हर्ड, बट इट इज हॉऊ यू हॅव्ह कव्हर्ड, दॅट मॅटर्स’ (अर्थात, काय केले यापेक्षा कसे केले हे महत्त्वाचे) या ओळी म्हणून दाखविताना देशाच्या सरन्यायाधीशांना गहिवरून आले. (chief justice of the supreme court of india uday lalit got emotional while responding to the felicitation) हायकोर्ट बार असोसिएशन, नागपूरतर्फे शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सरन्यायाधीश लळित यांचा सत्कार समारंभ झाला. सत्काराला सरन्यायाधीश उत्तर देत होते. मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्ना वराळे, न्या. सुनील शुक्रे, न्या. अतुल चांदूरकर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, सरन्यायाधीशांच्या पत्नी अमिता लळित, असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे, सचिव ॲड. अमोल जलतारे उपस्थित होते. नागपुरात झालेल्या हृद्य सत्काराला उत्तर देताना देशाच्या सरन्यायाधीशांनी आपल्या नागपुरातील आठवणींना उजाळा दिला. ‘सरन्यायाधीश म्हणून मिळालेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत मी माझ्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर करून विधी क्षेत्रासाठी जे करता येईल ते करेन’, असे आश्वासन त्यांनीही यावेळी दिले. न्या. गवई, न्या. दत्ता आणि माजी न्या. सिरपूरकर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. मोबाइलमधे आजही नागपूरचे छायाचित्र ‘माझ्या मोबाइलमधील सगळ्यात जुन्या छायाचित्रांपैकी एक नागपुरातील याच सभागृहातील आहे. असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्रात मी भाग घेतला होता, तेव्हाचे ते छायाचित्र आजही जपून ठेवले आहे’, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. विधी क्षेत्राचा पहिला अनुभव नागपुरात ‘मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती या नात्याने वडिलांच्या अखेरच्या दिवसाचे काम पाहण्यासाठी मी गेलो होतो. तोवर विधी क्षेत्राशी थेट संबंध कधीच आला नव्हता. त्या दिवशी पहिल्यांदा न्यायालय आणि तेथील कामकाज अनुभवले’, अशी आठवण सरन्यायाधीशांनी सांगितली. ‘ल’ आणि ‘ळ’चा फरक ‘सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या अमराठी लोकांना ‘ल ’आणि ‘ळ’ यांतील फरक कळत नाही. त्यामुळे सगळेच त्यांना ‘लळित’ नाही तर ‘ललित’ म्हणून संबोधतात. मात्र, केवळ मी त्यांना ‘लळित’ असे संबोधतो’, असे यावेळी माजी न्यायमूर्ती सिरपूरकर यांनी सांगितले. यावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी बंगाली असूनसुद्धा ‘लळित’ असा योग्य उच्चार करून दाखविला. माजी न्यायमूर्ती सिरपूरकर आजही माझ्या बंगाली नावाचा योग्य उच्चार करीत नाहीत, अशी कोपरखळीही मारली. यावर सभागृहात हशा पिकला. अखेर, आपल्या भाषणात सरन्यायाधीशांनी दत्ता यांचा बंगालीत दिपांकोर दत्तो असा उच्चार करून दाखविला. सभागृहाने यालासुद्धा टाळ्या आणि हशांनी उत्तर दिले. कुठे थांबायचे, ते माहिती... ‘एखाद्या न्यायमूर्तीला आपले म्हणणे पटत नसेल तर ते वकिलाला कळायला हवे. तसेच, युक्तिवाद कधी थांबवावा, हेसुद्धा कळायला हवे. लळित वकिली व्यवसायात असताना त्यांच्यात ती कला होती’, अशा शब्दांत माजी न्या. सिरपूरकरांनी सरन्यायाधीशांचे कौतुक केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BSLDKMh
No comments:
Post a Comment