Breaking

Saturday, September 17, 2022

मुंबईत १२ वी पास सेल्समनचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी घरावर छापा टाकल्यानंतर झाला भांडाफोड https://ift.tt/DlHbBfN

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मानखुर्द पोलिसांनी ५०, १०० आणि २०० रुपयांच्या हुबेहुब बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला शनिवारी अटक केली. रोहित शहा (२२) असे या तरुणाचे नाव असून मानखुर्द येथील घरातच तो या नोटांची छपाई करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून सात लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. रोहित याने याआधी किती बनावट नोटा आणि कुठे वितरित केल्या, याचा तपास सुरू असल्याचे मानखुर्द पोलिसांनी म्हटले आहे. परिसरातील संशयास्पद व्यक्ती, त्यांच्या हालचाली यांच्या हालचालीवर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वतीने बारकाईने नजर ठेवली जाते. गुन्हे प्रकटीकरण पथकातील कॉन्स्टेबल केदार आणि मीर यांना परिसरात बनावट नोटांची छपाई सुरु असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने सोनापूरमधील डुक्कर चाळीत असलेल्या दुमजली घरात छापा टाकला. वरच्या मजल्यावर रोहित शहा या लॅपटॉप आणि प्रिंटरच्या साहाय्याने नोटा छपाईचे काम करीत असल्याचे दिसून आले. ५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटा प्रिंटिंग करून त्याने घरामध्ये ठेवल्या होत्या. पोलिसांनी या सर्वांची गणती केली असता त्याचे मूल्य ७ लाखांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. या छपाई रॅकेटमध्ये रोहित एकटाच सक्रिय आहे की तो नोटा वितरित करण्यासाठी अन्य कुणाची मदत घेतो, याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बारावी पास सेल्समन रोहित याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून तो सेल्समन म्हणून नोकरी करतो. फावल्या वेळामध्ये इंटरनेटवर असताना त्याला नोटा छपाईची कल्पना सुचली. त्याने लॅपटॉप, प्रिंटर आणि वेगळ्या प्रतीचा कागद खरेदी केला आणि नोटांची छपाई करण्यास सुरुवात केली. कमी मूल्याच्या नोटा फार कुणी बारकाईने पाहत नसल्याने रोहित याने पाचशे आणि दोन हजारांऐवजी ५०, १०० आणि २००च्या नोटांची छपाई सुरू केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YmbOAa5

No comments:

Post a Comment