मुंबई : ४० आमदार आणि १२ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना राज्याच्या राजकारणात अनेक धक्के बसले. एकीकडे बंडखोरांना त्यांच्याच मतदारसंघात मात देऊन धडा कसा शिकवायचा याची तयारी करत आहेत. तर, दुसरीकडे दसरा मेळाव्यापूर्वी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठीही ठाकरेंनी तयारी सुरु केली आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेची खिंड लढवण्याचा चंग बांधलेला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतच मोठा धक्का बसलाय. भाजपच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षा ज्योत्स्ना दिघे यांनी शिवसेनेत प्रवेश करत पक्षाला रामराम ठोकलाय. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी मुंबईत शिवसेना काय करू शकते ते दाखवणं सुरु केलंय, असं बोललं जातंय. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप-शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. ठाकरेंची साथ सोडून काही जणांनी शिंदे गटाची वाट धरली. अशातच भाजपच्या उपाध्यक्षांची पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केल्याने मोठा राजकीय हादरा मानला जात आहे. मुंबई जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ज्योत्स्ना दिघे यांच्यासह अनेक कार्यकर्ते-समर्थकांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर दिघेंचा पक्षप्रवेश झाला. ज्योत्स्ना दिघे कोण? ज्योत्स्ना दिघे यांनी अर्थशास्त्र विषयातून एम. ए चं शिक्षण पूर्ण केलं. ज्योत्स्ना दिघेंनी तीन वेळा नगरसेविका म्हणून काम केलं. सामजित क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग असतो. भाजपकडून त्यांची मुंबई जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. आज दिघेंनी कार्यकर्ते-समर्थकांसह शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. पुढच्या चार महिन्यात मुंबई महापालिकेचं बिगुल वाजणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. ठाकरे सरकार उलथून टाकल्यानंतर आता भाजपचं मुंबई पालिकेवर लक्ष आहे. मुंबई पालिकेच वर्षाचं बजेट ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गेली २७ वर्ष शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आहे. मुंबई पालिकेची सत्ता ही शिवसेना पक्षासाठी मोठी ताकद आहे. ४० आमदार फुटल्यानंतर पालिकेची सत्ताही गेल्यास शिवसेनेची कोंडी होणार असल्याचं जाणकार बोलतात. दसरा मेळाव्यापूर्वी ठाकरेंनी झलक दाखवली खरी पण आगामी मुंबई पालिकेच्या निवडणूका जिंकण्याचा चंग हा भाजपने बांधला आहे. ज्योत्स्ना दिघे यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा आगामी काळात शिवसेनेला होणार आहे. तर, आगामी काळात खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणाकडे जाणार, यासारखे प्रश्न सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहेत. अशातच ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षांनी प्रवेश केला असून भाजपची पुढील भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VP8eQ1W
No comments:
Post a Comment