नाशिक : शहरातील एकलहरे रोड येथील फर्निचर व्यावसायिक शिरीष सोनवणे यांची हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. सोनवणे हे ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या कारखान्यातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह हा मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात आढळून आला होता. मात्र पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश येत नव्हते. आरोपींना पकडण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शहर तसेच ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणा प्रयत्न करत असताना अखेर नाशिकरोड पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लागला असल्याची माहिती समोर आली आहे. मृत शिरीष सोनवणे यांचा खून करणारे संशयित प्रवीण आनंदा पाटील (वय २८, रा. महाकाली चौक सिडको नाशिक) आणि सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर (वय ३६, राहणार-कालिका मंदिर मागे मुंबई नाका नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. अखेर त्यांना यश आलं आहे. काय आहे प्रकरण? शिरीष गुलाबराव सोनवणे (५६) हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह १० सप्टेंबर रोजी मालेगाव येथील सायतरपाडे येथे आढळला होता. मृत सोनवणे यांच्या एकलहरे रोडवरील फर्निचर कारखान्यात शाळेत विद्यार्थ्यांसाठी लागणारे बेंच बनवले जात असत. सोनवणे हे शुक्रवारी (दि.९) दुपारी साडेचारच्या सुमारास कारखान्यात असताना काही तरुण तिथे आले आणि सोनवणे यांना कारमध्ये टाकून घेऊन गेले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/r8EKu4O
No comments:
Post a Comment