Breaking

Monday, September 5, 2022

वाहतूक, चहापान कामातून शिक्षकांची सुटका; ई-पीक पाहणीचा आदेश रद्द https://ift.tt/qx1iVNI

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असतानाही शिक्षकांना अशैक्षणिक काम देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांना त्यांचे आदेश अखेर रद्द करावे लागले. त्यामुळे या शिक्षकांची अशैक्षणिक कामातून तात्पुरत्या स्वरूपात सुटका झाली आहे. शिक्षकांनी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची चहापानाची व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन करण्याचे आदेशही प्रशासकीय यंत्रणेने सुधारित परिपत्रके काढून रद्द केले आहेत. राज्यातील शिक्षकांना ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविणे, कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची चहापानाची व्यवस्था करणे, वाहतुकीचे नियोजन करणे, महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर नजर ठेवणे, चेकपोस्ट आणि जेट्टीवर वाहतुकीचे निय़ोजन करणे आदी सोपविण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी प्रशासकीय यंत्रणेवर संताप व्यक्त केला असून, या कामांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र टाइम्स'ने गेल्या आठवड्यात वृत्ताद्वारे प्रकाश टाकल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. त्यानंतर शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणाऱ्या सरकारच्या प्रशासकीय यंत्रणांवर राज्यभरातून टिकेची झोड उठली. तत्पूर्वीही, 'मनस्तापाची शाळा'या वृत्तमालिकेद्वारे शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांवर प्रकाश टाकण्यात आला होता. या कामांना संघटनांचा वाढता विरोध पाहता 'ई-पीक'पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी, शिक्षकांनी पालक सभा घ्याव्यात; तसेच स्नेहसंमेलनांमध्ये जनजागृती करावी, हा आदेश जामनेरच्या (जळगाव) तहसीलदारांना रद्द करावा लागला आहे. या पाठोपाठ गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची राजापूर बसस्थानकात चहापानाची व्यवस्था करणे आणि वाहतुकीचे नियोजन करणे, असा आदेश देणारे राजापूर (रत्नागिरी) पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्यावर त्यांचेच आदेश रद्द करण्याची वेळ आली. त्याचप्रमाणे मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ जेटी परिसरातील; तसेच लांजा चेकपोस्टवरील वाहतूक कोंडी दूर करण्याचे आदेशही रद्द झाले. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांच्या संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी निवेदनाद्वारे अशैक्षणिक कामांमधून सुटका करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. ... तर, हिवाळी अधिवेशनावर मोर्चा शिक्षकांची सध्या अशैक्षणिक कामांमधून सुटका झाली असली, तरी सरकारकडून पुन्हा या कामांची जबाबदारी शिक्षकांवर टाकली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील १५ दिवसांत प्रशासकीय यंत्रणांना निवेदनाद्वारे शिक्षकांचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे करूनही प्रशासकीय यंत्रणांना जाग आली नाही, तर नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर शिक्षकांचा मोठा मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस विजय कोंबे यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/F4W3iTD

No comments:

Post a Comment