पुणे : संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (वय ६६) यांचं आज संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ऐसा वासुदेव बोलतो बोल, विंचू चावला, दार उघड बये आता दार उघड, सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहील तुला, शकुन सांगाया आले यमाई माझे नाव, अशा संत एकनाथांच्या भारुडांच्या सादरीकरणाद्वारे समाजप्रबोधनाचं काम डॉ. रामचंद्र देखणे यांनी केलं. लोककला, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ भारुडकार डॉ रामचंद्र देखणे यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने महाराष्ट्रातील लोककलांचा एक चालता -बोलता विश्वकोश हरपला आहे. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील नोकरीतून निवृत्तीनंतर डॉ. देखणे यांनी संत साहित्य अभ्यासात झोकून देऊन काम केले. संत साहित्यासह लोक वाङमय व भारुडांचाही त्यांचा अभ्यास होता. त्यांनी ललित, संशोधनात्मक व चिंतनात्मक ४७ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. विविध संत साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर कीर्तन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले होते. मागील ३५ वर्षांहून अधिक काळ संतविचार प्रबोधिनी दिंडीच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रचार व प्रसाराचे काम ते करत होते. राज्य सरकारसह विविध संस्थांनी त्यांना शंभरवर पुरस्कार दिले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई आणि मराठी वाङ्मय मंडळ, अंमळनेर (जि. जळगाव) तसेच अप्पासाहेब केले सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन २०१७ मध्ये करण्यात आलं होतं. २५, २६ फेब्रुवारी २०१७ ला झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली होती. डॉ. देखणे यांनी गावशिवार, लोकदैवते, लोकपरंपरा तसेच लोककलेतील गोंधळ, भारूड, पोवाडा, लावणी, गण-गवळण, तमाशा, कीर्तन, पंढरीची वारी इत्यादी लोकसंस्कृतीचे पदर त्यांनी संशोधनात्मक पद्धतीने उलगडून दाखविले. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी देखणे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, त्यावेळी त्यांनी या पदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्टीकरण संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी दिले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aZBiVp2
No comments:
Post a Comment