म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : आमदारांना पैसे दिले नाही, याची सत्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावी, असे आव्हान माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी येथे पत्रपरिषदेत दिले. तसेच, थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आमदारांना 'खोके' देण्यात आल्याचा आमदार रवी राणा यांनी केलेला आरोप राज्यात चांगलाच गाजत आहे. बच्चू कडू आणि राणा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. रवी राणा यांनी लावलेल्या आरोपांमुळे आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. घरातील कुणीही आमच्याकडे बोट दाखवत असेल तर, छाटण्यात येईल, असा इशाराही आमदार कडू यांनी यावेळी दिला. आम्ही कुणाच्या भरवशावर निवडून आलेलो नाही. 'वन मेन आर्मी'प्रमाणे किल्ला लढवत चारवेळा विजयी झालो. कष्टातून कारकिर्द उभी केली. दहा पक्षांचा पाठिंबा घेऊन निवडणुकीत विजय मिळवला नाही, असा टोलाही आमदार कडू यांनी यावेळी लगावला. आमच्यावरील आरोप म्हणजे मतदारांवर आक्षेप घेण्याचा हा प्रकार आहे. आरोप केलेले पैसे काही पाकिस्तानातून आलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती सांगावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन करून कारवाईची मागणी केली; पण उलट परत आरोप करण्यात आले, याकडेही आमदार कडू यांनी लक्ष वेधले. राणा यांनी आरोप लावण्याचे धाडस का केले, त्यांना गप्प बसवावे लागेल. बदलत चाललेल्या संस्कृतीवर टीका करताना मी कुणावरही आरोप केले नाही व नाव घेतले नाही. राणा यांना ही बाब का झोंबली, असा सवालही कडू यांनी केला. रवी राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्यावेत आणि वस्तुस्थिती समोर आणावी; अन्यथा त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अनेक आमदारांनी फोन करून आरोपांबाबत नाराजी व्यक्त केली. राणांविरुद्ध अमरावतीच्या पोलिस ठाण्यात तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. 'हनुमान चालिसा पठनाचा निर्णय चुकीचा' मी कोणतेही मंत्रिपद मागितलेले नाही. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय व्हावे व मंत्री केल्यास याच खात्याचा कार्यभार मिळावा, अशी अपेक्षा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठन करण्याचा निर्णय अतिशय चुकीचा होता, असेही बच्चू कडू म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jTGw7q1
No comments:
Post a Comment