Breaking

Tuesday, October 18, 2022

काँग्रेसनं हिमाचल प्रदेशचं रणशिंग फुंकलं, पहिली जम्बो यादी जाहीर, भाजपचं बैठकांचं सत्र https://ift.tt/cuQxAgf

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या विरोधात पक्षानं चेतराम ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. चेतराम ठाकूर हे हिमाचल प्रदेश काँग्रेसचे सचिव आहेत. हिमालच प्रदेशच्या विधानसभेची सदस्यसंख्या ६८ इतकी आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल ४६ उमदेवारांची पहिली यादी जाहीर करत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे. विधानसभेच्या ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, भाजप विरोधात काँग्रेस आणि आप देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिरंगी लढत होणार असल्यानं मतदार कुणाला कौल देतात हे पाहावं लागेल. भाजपचा सर्व्हे हिमाचल प्रदेशातील सत्ताधारी भाजपकडून निवडणुकीसंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं आहे. भाजप विधानसभेसाठी जपून पावलं टाकत आहे. कसल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपनं हिमाचल प्रदेशातील विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी अंतर्गत मतदान घेतल्याची माहिती आहे. पक्षानं एका मतदारसंघात तीन तीन नावांची शिफारस करण्याच्या सूचना केल्याचं कळतंय. येत्या १२ नोव्हेंबरला (शनिवारी) हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्र तळ मजल्यावरच असेल. हिमाचलमध्ये एकूण 55.07 लाख मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावतील. भाजपसह काँग्रेससाठी निवडणूक महत्त्वाची हिमाचल प्रदेश हे राज्य प्रत्येक टर्मला सत्तांतर घडवणारं राज्य म्हणून ओळखलं जातं. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. आता, भाजपसमोर काँग्रेस आणि आपचं आव्हान आहे. भाजप हिमाचल प्रदेशात पुन्हा सत्ता काबीज करणार का हे पाहावं लागेल. हिमाचल प्रदेश निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक सुरु होती. भाजपनं हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्याच्या इराद्यानं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येतं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hwFgXIo

No comments:

Post a Comment