मुंबई : आरेमध्ये गेल्या सोमवारी दिवाळीच्या दिवशी १६ महिन्यांच्या मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाल्यानंतर रविवारपर्यंत दोन बिबट्यांना पकडण्यात आले आहे. आरे वसाहतीच्या युनिट नंबर १५ येथून रविवारी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्या आधी बुधवारी एका बिबट्याला पकडण्यात आले होते. अवघ्या पाच दिवसांमध्ये या दोन बिबट्यांना वनविभागाने पकडले आहे. रविवारी आरेच्या युनिट १५ येथील पिंजऱ्यामध्ये पकडण्यात आलेला बिबट्या सी ५६ असून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहे. सोमवारी इतिका लोटे या १६ महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर मानव-प्राणी संघर्षासाठी कारणीभूत असलेला बिबट्या हाच आहे का, याचा शोध घेतला जात आहे. याआधी बुधवारी सी-५५ या नर बिबट्याला युनिट १६ जवळून पकडण्यात आले होते. हा बिबट्या तीन वर्षांचा आहे. या परिसरामध्ये मानव-प्राणी संघर्षासाठी तीन बिबट्यांबद्दल शक्यता व्यक्त केली जात आहे. यात दोन नर बिबटे आणि एका मादी बिबट्याचा समावेश आहे. ही तीनही भावंडे आहेत. यातही मानव-प्राणी संघर्षासाठी नर बिबट्या कारणीभूत असल्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोन्ही बिबट्यांना पकडले तरी या परिसरामध्ये पेट्रोलिंग आणि कॅमेरा ट्रॅप येत्या काळात कायम असतील, असे वनविभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Dpgv0eh
No comments:
Post a Comment