म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईतून साधारण ८ ऑक्टोबर आणि महाराष्ट्रातून १० ऑक्टोबरला मान्सून परतीचा प्रवास करतो. मात्र यंदा या परतीच्या प्रवासासाठी आणखी काही दिवस उशीर होईल असे अनुमान आहे. प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अनुमानानुसार मुंबई आणि कोकणात १० ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी पाऊस असेल. त्यामुळे महाराष्ट्रातून परतीच्या पावसाच्या तारखेचे अनुमान जाहीर करण्यात आलेले नाही. प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या अनुमानानुसार उत्तर आणि दक्षिण कोकणात शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस असेल. मात्र त्यानंतर त्याची व्याप्ती वाढेल. सोमवार १० ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र येथे अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. या पावसाचा जोर फार नसला तरी पावसामुळे वातावरणात कोरडेपणाही आलेला नसेल. या पार्श्वभूमीवर पावसाच्या परतीच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. त्यामुळे सरासरी तारखेनंतरच पाऊस परतीच्या प्रवासाला सुरुवात करू शकेल. आंध्र प्रदेश आणि शेजारील भागावर असलेली चक्रीय वातस्थिती सध्या सक्रिय आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून उत्तर प्रदेशचा काही भाग, तेलंगणा, विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेश येथे द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाळी वातावरण आहे. तसेच सध्या वाऱ्यांची दिशाही बदलती आहे. पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मेघगर्जनाही होत आहेत. ही द्रोणीय स्थिती आणि तसेच वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलल्याशिवाय वातावरणात कोरडेपणा निर्माण होणार नाही. दिवाळीपर्यंत लांबणार नाही सध्या पडणाऱ्या पावसाची तीव्रता खूप नसली तरी व्याप्ती अधिक आहे. या आठवड्यात पडणारा पाऊस झोडपून काढणार नाही, त्यामध्ये मेघगर्जनेची मात्र मोठी शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने प्रसारित केलेल्या जिल्हानिहाय अनुमानामध्ये पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, बीड येथे सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, कोल्हापूर, सातारा येथे शनिवारपर्यंत तर सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना येथे रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. विदर्भात शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. त्यामुळे मुंबई तसेच महाराष्ट्रातून पावसाची माघार जाहीर होण्यासाठी पुढच्या आठवड्यापर्यंत वेळ लागू शकेल असे अनुमान आहे. मात्र हा पाऊस दिवाळीपर्यंत नक्कीच लांबणार नाही, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xbOHkL1
No comments:
Post a Comment