Breaking

Wednesday, November 16, 2022

'मेट्रोपोलिस'वर प्राप्तिकरचा छापा; नफा व मिळकत लपविण्याचा संशय https://ift.tt/DIQVdw6

मुंबई : प्राप्तिकर विभागाने मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या कार्यालयावर बुधवारी छापा टाकला. सुमारे १२ तास तपास व चौकशी सुरू होती. या कंपनीने मिळकत कमी दाखवून नफा लपविल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोपोलिस हेल्थकेअरने त्यांच्या ताळेबंदात एकूण मिळकत व नफा, असे दोन्ही कमी दर्शविले आहेत. पण, प्रत्यक्षात कंपनीचा व्यवसाय अधिक आहे. त्यामुळे त्यांनी मिळकत लपवली असून, काही प्रमाणात रोखीने व्यवहार केल्याचा संशय आहे. त्यासंबंधी तपासासाठीच हा छापा टाकण्यात आला. या कंपनीचे मुख्यालय वरळी परिसरात आहे. तर विद्याविहार येथे जागतिक स्तरावरील संशोधन प्रयोगशाळा आहे. या दोन्ही ठिकाणी प्राप्तिकर विभागाने तपास केल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने पॅथालॉजीसंबंधी नेमक्या केलेल्या चाचण्या, त्यांच्या पावत्या व प्रत्यक्षात मिळालेला महसूल, यांची तपासणी याअंतर्गत करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कंपनीला जुलै ते सप्टेंबर या तिमाहित ४०.४८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. मात्र, करापूर्वीच्या मिळकतीत मागीलवर्षीपेक्षा १२.९८ टक्क्यांची घट होऊन तो ८३.३७ कोटी रुपयांवर आला. हा आकडा कमी झाल्यानेच मिळकत लपविल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. त्यातूनच हा तपास करण्यात आल्याचे विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, या कारवाईप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून अधिकृत माहिती बुधवारी रात्रीपर्यंत देण्यात आलेली नव्हती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/duLnpW0

No comments:

Post a Comment