Breaking

Tuesday, November 1, 2022

सरकारे बदलली; पण, पनवेलची अर्थकोंडी कायम; १२०० कोटींच्या जीएसटी थकबाकीचा प्रश्न न्यायालयात https://ift.tt/F5zk9nO

मुंबई : जीएसटी कराच्या भरपाईपोटी तब्बल १२०० कोटी रुपयांहून अधिक अनुदान राज्य सरकारकडे थकित असल्याने अवघ्या सहा वर्षांपूर्वीच स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेची पुरती आर्थिक कोंडी झाली असल्याचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही मुश्कील झाले असल्याचे म्हणणे खुद्द महापालिकेनेही मांडल्याने मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने दिलेल्या सूचनेप्रमाणे अखेर राज्य सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर या महापालिकेला २५ कोटी रुपयांचा निधी हंगामी उपाय म्हणून नुकताच दिला. शिवसेना-भाजप युती सरकार, महाविकास आघाडी सरकार आणि आता एकनाथ शिंदे-भाजप सरकारच्या काळातही पनवेल महापालिकेची आर्थिक कोंडी सुरूच असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. माजी नगरसेवक अनिल भगत यांनी अॅड. प्रीत फणसे यांच्यामार्फत याप्रश्नी जनहित याचिका केली आहे. 'पनवेल नगरपालिकेलगतच्या काही गावांचा समावेश करून १ ऑक्टोबर २०१६ रोजी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली. त्यानंतर नगरविकास विभागाच्या २९ डिसेंबर २०१६च्या अधिसूचनेप्रमाणे महापालिकेने १ जानेवारी २०१७ रोजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) आकारणी सुरू केली. मात्र, नंतर जीएसटी लागू झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, यादृष्टीने राज्य सरकारने महाराष्ट्र जीएसटी (स्थानिक स्वराज्य संस्थांना भरपाई) कायदा, २०१७ लागू केला. त्यानुसार, एलबीटी आकारणी थांबवण्याचे निर्देश १ जुलै २०१७ रोजी सरकारने पनवेल महापालिकेला दिले. त्यामुळे महापालिकेला एलबीटी आकारणी केवळ सहा महिन्यांपुरती करता आली. त्यानंतर जीएसटीची भरपाई योग्य प्रमाणात मिळणे अपेक्षित असूनही राज्य सरकारकडून मिळाली नाही. परिणामी महापालिकेची आर्थिक कोंडी झाली असून पनवेल परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. महापालिकेला अनेक कल्याणकारी योजना राबवणे मुश्कील होत आहे. परंतु, महापालिका सरकारविरोधात बोलू शकत नसल्यानेच ही याचिका करावी लागली आहे', असे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले. त्याचबरोबर सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही मुश्कील झाल्याचे म्हणणे याचिकादारांतर्फे अॅड. यतीन मालवणकर व महापालिकेतर्फे अॅड. ए. एस. राव यांनी मांडले. 'स्थानिक निधी लेखा परीक्षा शाखेने २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा महापालिकेचा महसूल १४ कोटी ११ लाख रुपये प्रमाणित केला. त्याअनुषंगाने राज्य सरकारने ते आधारभूत वर्ष मानून महापालिकेचा वार्षिक महसूल ३३ कोटी ११ लाख रुपये गृहित धरुन एकूण २२७ कोटी दहा लाख रुपयांचे जीएसटी अनुदान दिले. आधारभूत वर्षाच्या महसूलाचा योग्य आकडा ५८ कोटी ९९ लाख रुपये असल्याने तो आधार मानून जीएसटी अनुदान मिळावे, अशी विनंती महापालिकेने १० ऑगस्ट २०२२ रोजी केली आहे. तो प्रश्न सध्या विचाराधीन असून निर्णय घेण्यासाठी अवधी द्यावा', अशी विनंती राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सप्टेंबरमध्ये केली होती. त्यानुसार, खंडपीठाने सरकारला अवधी दिला. मात्र, तूर्त हंगामी उपाय म्हणून विशिष्ट निधी देण्याची सूचनाही सरकारला केली. त्यानुसार, २५ कोटींचा निधी तात्काळ स्वरूपात देण्याची तयारी वित्त विभागाने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दर्शवली. त्यानुसार हा निधी महापालिकेला नुकताच मिळाला. आता याप्रश्नी पुढील सुनावणी १० नोव्हेंबरला होणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aQnkGW5

No comments:

Post a Comment