Breaking

Friday, December 30, 2022

पंत स्वत: कार का चालवत होता? ड्रायव्हर का नव्हता? रुग्णवाहिकेत खुद्द ऋषभनंच सांगितलं कारण https://ift.tt/A2qx301

नवी दिल्ली: क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दिल्ली-देहरादून महामार्गावर पंतची कार दुर्घटनाग्रस्त झाली. रुरकीजवळच्या मोहम्मदपूर जाट परिसरात कारला अपघात झाल्यानंतर पंतला जवळच असलेल्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पंतला डुलकी लागल्यानं त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात झाला. अपघातानंतर कारनं पेट घेतला. सुदैवानं पंत वेळीच बाहेर आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पंत कारबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. विंडशील्ड फोडून तो बाहेर येण्याच्या प्रयत्नात होता. मात्र जखमांमुळे त्याला बाहेर पडता येत नव्हतं. त्यावेळी हिमाचल रोडवेजच्या बसचे वाहक, चालक त्याच्या मदतीला धावले. त्यांनी पंतला कारमधून बाहेर काढलं आणि रुग्णवाहिकेसाठी फोन लावला. रुग्णवाहिका पहाटे ५.४० च्या सुमारास अपघातस्थळी पोहोचली. त्यावेळी फार्मासिस्ट मोनू कुमार रुग्णवाहिकेत होते. मोनू कुमार यांनी पंतला लगेच स्ट्रेचरवर झोपवलं आणि रुग्णवाहिकेत ठेवलं. त्यावेळी पंतच्या डोळ्याला दुखापत झाली होती. नाकातून रक्तस्राव सुरू होता. त्याच्या पाठीला आणि पायांना इजा झाली होती. चेहरा रक्तानं माखलेला असलेला पंत ओळखू येत नव्हता. मोनू कुमार यांनी त्याला नाव विचारलं. त्यावर आपण भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू असल्याचं उत्तर त्यानं दिलं. मला खूप वेदना होत आहेत. आधी वेदनाशामक इंजेक्शन दे, असं ऋषभनं मोनू यांना सांगितलं. यानंतर मोनू यांनी पंतला इंजेक्शन दिलं. मला कोणत्या तरी चांगल्या खासगी रुग्णालयात घेऊन चल, असं पंत म्हणाला. यानंतर मोनू यांनी त्याला रुरकीतील सक्षम रुग्णालयात दाखल केलं. हे रुग्णालय घटनास्थळापासून १० ते १२ किमी दूर आहे. अपघात कसा झाला याबद्दल मोनूनं पंतकडे विचारणा केली. त्यावर मला काही आठवत नाही. डोळा लागला. त्यानंतर आगीमुळे पेटलेली कार दिसली, असं पंतनं सांगितलं. तुम्ही स्वत: कार का चालवत होतात, असा प्रश्न मोनू कुमार यांनी विचारला. 'एकट्याला कार चालवण्याची फारशी संधी मिळत नाही. त्यासाठी वेळच नसतो. आज संधी मिळाली. त्यामुळे दिल्लीहून ड्राईव्ह करत रुरकीला घरी जाण्याचा विचार करून निघालो,' असं पंत म्हणाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/m2NvkGU

No comments:

Post a Comment