सांगली: गोपीचंद पडळकर म्हणलं की रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा आणि विरोधकांवर अक्षरशः तुटून पडणारा नेता असं चित्र समोर येतं. त्यांनी वंचितमधून लोकसभा लढवली, त्यानंतर भाजपात प्रवेश केला. विधानसभेला बारामतीत अजित पवार यांना आव्हान दिलं आणि डिपॉझिट जप्त झालं.. पडळकरांच्या आक्रमकतेचं बक्षिस म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेचं आमदार केलं, राज्यात सत्ता नसतानाही पवारांना विखारी भाषेत अंगावर घेणारा एकमेव नेता म्हणून पडळकरांनी नाव मिळवलं.. पण सत्ता येताच पडळकरांचं नाव आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय. त्यांच्या भावाने एका कृत्यामुळं पडळकरांचं नाव वादात सापडलं. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील काही दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने रातोरात पाडण्यात आली.यामुळे येथे दोन गटात राडा झाल्याची घटना घडली.भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी हे अतिक्रमण बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आणि हा वाद थेट मुंबई हायकोर्टापर्यंत पोहोचला. मिरजमध्ये नेमकं काय घडलं? ६ जानेवारीला मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील बस स्टँडजवळील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकतींचं मध्यरात्री ३ वाजता जेसीबीच्या सहाय्याने पाडकाम करण्यात आले. या जागेचा ताबा घेण्यासाठी ब्रह्मानंद पडळकर आले होते, असा नागरिकांचा दावा आहे. सुमारे १ हजार लोकांचा जमाव लाठ्या, काठ्या, लोखंडी सळई या हत्यारासह आल्याचा नागरिकांचा दावा आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आहेत. तेही या कृत्यामध्ये सहभागी आहेत का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत आलेल्या दीड-दोनशे गुंडांवर योग्य त्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. या प्रकारानंतर प्रशासनाने या जागेतील वहिवाट असलेल्या १८ ते २० नागरिकांच्या नावे नोटीस काढत कलम १४५ लावले. त्यानंतर या प्रकरणाचा वाद मिरज तहसीलदारांसमोर गेला. जागेच्या ताब्यावरुन जागेचे मालक आणि वहिवाटदार कब्जेदारांची मिरज तहसीलदारांसमोर सुनावणी देखील झाली. ज्यामध्ये २ दिवसांसाठी जैसे थे आदेश देण्यात आले आहेत. या सगळ्यानंतर आपल्या भावावर झालेले गंभीर आरोप पाहता पडळकरांनी यासंदर्भात बाजू मांडली. 'तोडण्यात आलेले गाळे बेकायदा होते, माझ्या भावानं काहीही चुकीचं काम केलेलं नाही. मुळात तिथे राहणारेच बेकायदेशीर होते. मिरजेतील ज्या हॉटेल्स पाडण्यात आल्या आहेत, त्यांचं पाडकाम हे कायदेशीर पद्धतीनंच करण्यात आलं.' असं गोपीचंद पडळकर म्हणाले. "रातोरात करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. त्याचबरोबर सत्तेचा गैरवापर हा पक्षात सहन केला जात नाही." असा इशारा पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी ब्रम्हानंद पडळकरांना दिला. त्यामुळे ब्रम्हानंद पडळकरांनी या जागेची बेकायदेशीर रित्या खरेदी केली का? ही कारवाई मध्यरात्री का करण्यात आली? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. मात्र आता या जागेच्या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट समोर आले आहे, ते म्हणजे या जागेचे मूळ आणि कुळ मालक असणारे विष्णुपंत लामदाडे हे आता पुढे आले आहेत, या जागेच्या मालकीचा वाद १९९० पासून मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू असून १५ मार्च रोजी सुनावणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे या जागेचा तिढा आणि गुंता आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेकायदेशीररित्या अतिक्रमण पाडलेल्या पडळकारांच्या भावावर कारवाई होणार का? हा सुद्धा प्रश्व अनुत्तरीत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4ewup5T
No comments:
Post a Comment