Breaking

Sunday, January 15, 2023

भारताचा गोल नाकारला, पण तरीही साधली बलाढ्य इंग्लंडशी बरोबरी https://ift.tt/bNPVhTg

राउरकेला : भारत आणि इंग्लंड यांच्यातील हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेतील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. बिरसा मुंडा स्टेडियमवर रविवारी झालेल्या या सामन्यात एकही गोल झाला नसला, तरी त्यातील थरार श्वास रोखून धरणारा होता. सामन्यातील अखेरच्या सेकंदांत भारताने इंग्लंडचे आक्रमण रोखून हार टाळली.भारत आणि इंग्लंड यांच्यातील यापूर्वीच्या लढतीत प्रतिस्पर्धी संघांतील आक्रमकांनी बचावफळीवर वर्चस्व राखले होते; पण या लढतीत बचावफळीनेही तोडीस तोड खेळ केला. त्यामुळे आक्रमण आणि बचाव यांच्यातील कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. 'गोल सोडल्यास हॉकीतील थराराचा पुरेपूर अनुभव या लढतीने दिली,' ही भारताचे माजी कर्णधार वीरेन रस्कीन्हा यांची प्रतिक्रियाच सामन्यातील चुरस दाखवणारी होती. या सामन्यात दोन्ही संघांना जिंकण्याची नक्कीच संधी होती; पण ही लढत बरोबरीत सुटणे हाच योग्य न्याय होता. शेवटची काही मिनिटे तर भारतीय चाहत्यांसाठी श्वास रोखून धरणारी होती. पाच मिनिटे असताना हार्दिक सिंगला गंभीर दुखापत झाली. यामुळे तो आगामी सामन्यास मुकण्याची शक्यता आहे. सुमारे दीड मिनिटे असताना मनप्रीतच्या चेहऱ्यावर चेंडू लागला. १९ सेकंद असताना इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर लाभला. मात्र, भारतीय हा पेनल्टी कॉर्नर रोखत हार टाळली.भारतीय चाहत्यांना त्यापेक्षाही तिसऱ्या सत्रातील अखेरच्या मिनिटांत नाकारलेला गोल सलत असेल. त्या वेळी अभिषेकने चेंडू गोलजाळ्यात धाडला होता. गोलक्षेत्रात भारतीयांनी दाखवलेले सामंजस्य जबरदस्त होते. पंचांनी अभिषेकने चेंडू गोलजाळ्यात धाडण्यापूर्वी फाउल केल्याचा निर्णय पंचांनी दिला, त्या निर्णयाविरोधात भारतास दाद मागता आली नाही. त्यापूर्वीच भारताच्या अपीलच्या संधी संपल्या होत्या.या बरोबरीमुळे भारत गटात दुसरा आहे. सरस गोलफरकामुळे इंग्लंडने (५) भारतास (२) मागे टाकले आहे. मात्र, गटात दुबळ्या असलेल्या वेल्सला पराभूत करून भारतास गोलफरक उंचावण्याची संधी आहे. भारताची ही लढत १९ जानेवारीस भुवनेश्वरला संध्याकाळी ७ वाजता होईल. त्यापूर्वी इंग्लंड आणि स्पेन ही लढत त्याच दिवशी होणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UzNdMnx

No comments:

Post a Comment