उल्हासनगर: अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहाड भागातील एका कॉलनीमध्ये घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सख्ख्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल करुन अमित गांगुर्डे (वय २६) याला अटक केली आहे. तर रोहित गांगुर्डे (वय २८) असे निर्घृणपणे हत्या झालेल्याचं नाव आहे.पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मृत आणि आरोपी हे अंबरनाथ शहरात एकत्र राहत असून दोघेही सख्खे भाऊ आहेत आणि दोघांचा विवाह झाला आहे. मृत मोठा भाऊ रोहित हा आरोपी लहान भावाच्या पत्नीशी जवळीक साधून तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी दोघांना अनैतिक संबंध प्रस्थापित करताना मृतकाच्या पत्नीने पाहिले होते. तेव्हापासूनच दोघा भावात वाद सुरु झाले. त्यानंतर काही नातेवाईकांनी मध्यस्थी करत प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही मृत मोठ्या भावाने चोरीछुपे भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध सुरुच ठेवले. हे त्याच्या आरोपी भावाला समजले होते.त्यातच उल्हासनगर शहरातील शहाड फाटक परिसरात छत्रपती शाहू महाराज कॉलनीत राहणाऱ्या आजीकडे मृतक रोहित शुक्रवारी दुपारच्या सुमारास आला होता. त्यावेळी आजीच्या घरातच आरोपी अमित आणि रोहित या दोन भावांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण झाल्यानंतर रोहित आजीच्या घरात झोपला होता. यावेळी आरोपी भाऊ अमितने घरातील दगडी पाटा थेट झोपलेल्या रोहितच्या डोक्यात मारून त्याला जागीच ठार केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी तात्काळ भेट देत पंचनामा करत रोहितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी आरोपी अमित याला ताब्यात घेतले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून अमितला अटक केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vgTa73q
No comments:
Post a Comment