म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर :‘अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे सव्वा दोन वर्षे बंद दाराआड होते. उर्वरित दोन-तीन महिन्यांत त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलला असल्यास मला त्याची माहिती नाही,’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे लगावला. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरणाच्या श्रेयाचा वाद उद्भवला आहे. नागपूर दौऱ्यावर आले असता फडणवीसांनी या मुद्द्यावर पत्रकारांशी संवाद साधला.‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळाने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा ठराव संमत केला. केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवल्यानंतर शुक्रवारी त्यावर मोहोर लागली. मात्र, सर्व काही आपल्याच काळातील असल्याचे काही जणांना वाटते. कदाचित, पंतप्रधान मोदींना फोन केल्याने नामकरण झाले, असेही ते सांगू शकतात’, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली. त्यामुळे शहराचे नाव बदलले आहे. आता नगरविकास आणि महसूल विभागाच्या अधिसूचना निघाल्यानंतर संपूर्ण जिल्हा, तालुका, महापालिका व नगरपालिकेची नावे बदलतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पराभवाच्या धास्तीने महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून रडीचा डाव खेळला जात आहे. धंगेकर मतदारांचा अवमान करत आहेत. भाजप कधीच पैसे वाटत नाही. मतदार आम्हाला निवडून देतात. आमची संस्कृती पैसे वाटण्याची नाही, ती काँग्रेस-राष्ट्रवादीची आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने असे उद्योग केले जात असून, आचारसंहितेचे हे उल्लंघन आहे,’ असेही ते म्हणाले.श्रेयासाठी धडपडपंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर शक्य झाले, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांना नामांतर करण्याचे सुचले नाही. आता त्यांची श्रेयासाठी धडपड सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांची सत्ता असती तर शिवसेनेचे अनेक आमदार पराभूत झाले असते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी झाले असते. त्यामुळे शिवसेनेच्या ५० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा योग्य निर्णय घेतला. फडणवीस जे बोलतात ते विचारपूर्वक व पुराव्यानिशी बोलतात, असेही बावनकुळे म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EAKclR8
No comments:
Post a Comment