नागपूर : पारडी पोलीस ठाण्यांतर्गत एका १२ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेजाऱ्यांनी मुलगी लटकलेली पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अश्विनी संपत झोडे (१२) असे मृत मुलीचे नाव असून, ही मुलगी तिची आई आणि १५ वर्षीय मोठ्या भावासोबत काजल बिअरबार, शिवनगरच्या मागे भाड्याच्या घरात राहत होती. आई लोकांच्या घरी घरकाम करून स्वतःचा आणि मुलांचा उदरनिर्वाह करते, तर वडिलांचे आधीच निधन झाले आहे. अभ्यासाच्या तणावामुळे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुलगी घरी एकटीच होती. तिचा मोठा भाऊ खेळायला गेला होता. त्यानंतर शेजाऱ्यांना मुलगी लटकलेली दिसली. हा प्रकार समजताच पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मुलीला खाली उतरवले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आत्महत्यांचे सत्र सुरूच एकाच आठवड्यात दोन विद्यार्थांचे आत्महत्यांचे प्रकरण समोर आले आहे. परीक्षेचा अभ्यास न झाल्याने उद्याच्या पेपरमध्ये काय सोडविणार, या टेन्शनमुळे २२ वर्षीय एमसीएच्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मानकापूर येथील गोधनी रेल्वेलाईन ची आहे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. यश प्रकाश माने असे मृताचे नाव असून तो जुनी वस्ती, एसआरए बिल्डिंगजवळ झिंगाबाई टाकळी येथे राहत होता.या दोन्ही घटनांचा आढावा घेतला असता, विद्यार्थी अभ्यास आणि परीक्षेच्या किती तणावाखाली आहेत, हे स्पष्ट होत आहे. अभ्यास, परीक्षेचा ताण वाढत आहे. यातून आलेल्या नैराश्यातूनच विद्यार्थी जीवन संपवित आहेत. विद्यार्थी आत्महत्या का करतात...?आयुष्यात एखाद्या समस्येवर कोणत्याही प्रकारची उपाययोजना दिसत नसल्यास वा त्या समस्येशी संघर्ष करण्याची क्षमता गमावल्याची भावना निर्माण झाल्यास व्यक्ती आत्महत्येकडे वळतो. सध्याच्या तरूणांमध्ये नैराश्याचीभावना मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. त्यामुळेच तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.अभ्यासाचा ताण, प्रेमभंग किंंवा प्रेमाला कुटूंबाकडून होणारा विरोध, कार्यालयातील कामांचा तणाव, अतिकामाने येणारा तणाव, यामुळेही अनेकजण आत्महत्येसारखे पाऊल उचलतात.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VYt73Ey
No comments:
Post a Comment