Breaking

Wednesday, February 8, 2023

फिरकीवर कोण घेणार विजयाची गिरकी... नागपूर कसोटीमध्ये या दोन गोष्टी ठरवणार विजेता https://ift.tt/kAtjxmU

नागपूर : भारताच्या रोहित शर्माची कर्णधार म्हणून ही सर्वांत मोठी आणि आव्हानात्मक मालिका असेल. या मालिकेत त्याच्या नेतृत्वाची खरी कसोटी असेल. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या मागील तिन्ही कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. त्याचे उट्टे काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ उत्सुक आहे. मात्र, भारताला भारतात हरवणे सोपे नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची कसोटी असेल. ही लढत विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. या मैदानाची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे क्युरेटरचीही कसोटीच असेल. फिरकीला अनुकूल खेळपट्टी म्हणजे फलंदाजांची कसोटी आणि ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या फलंदाजांना झटपट रोखण्यासाठी भारताच्या फिरकी गोलंदाजांची कसोटी असेल. अंतिम अकरामध्ये कोणाला स्थान द्यायचे, यासाठी भारतीय संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. मालिका भारतात होत असल्याने भारताचे पारडे जड आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचे काही प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत; तसेच फिरकीचे आणि खेळपट्टीचे दडपण ऑस्ट्रेलियावर असेल, यात शंकाच नाही. सलग चौथ्या मालिकेत हार टाळण्याचेही दडपण ऑस्ट्रेलियावर असेल. भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडूंची कसून तयारी करून घेतली आहे. त्यांच्या हाती स्वीपचे ‘शस्त्र’ दिले आहे. एकूण दहा फिरकी गोलंदाजांसह भारतीय फलंदाजांनी नेटमध्ये सराव केला आहे. प्रत्येकाचा स्वतंत्र सराव झाल्याचे उपकर्णधार लोकेश राहुलने सांगितले होते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने सराव सामना न खेळता फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या तयार करून भारतात सराव केला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० कसोटींत ३९ विकेट घेतल्या आहेत. तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी अश्विनसारखी गोलंदाजी करणाऱ्या महेश पिठियाची मदत ऑस्ट्रेलियाने घेतली.रोहित शर्मासह सलामीला कोण येणार, हा प्रश्न सुटलेला नाही. यासाठी शुभमन गिल आणि लोकेश राहुल यांच्यात स्पर्धा आहे. राहुल सलामीला आला, तर सहाव्या क्रमांकासाठी गिल आणि सूर्यकुमार यादवमध्ये स्पर्धा असेल. गिल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. प्रशिक्षक द्रविड यांचा त्याच्यावर विश्वास आहे. सूर्यकुमार पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. यष्टिरक्षक म्हणून लोकेश राहुलला स्थान देण्याबाबतही संघव्यवस्थापनाला विचार करावा लागणार आहे. त्याचबरोबर कोना श्रीकर भारतला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळू शकते. ईशान किशन हा पर्याय आहेच. पण हा कसोटी सामना जिंकण्यासाठी आता दोन गोष्टी महत्वाच्या असतील. त्यामधील पहिली म्हणजे खेळपट्टी. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. विजयासाठी दुसरी गोष्ट म्हणजे टॉस. कारण टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी कोण घेतं, हेदेखील महत्वाचे असणार आहे.खेळपट्टीचा अंदाजविदर्भ क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल. पहिल्या दिवसापासून चेंडू वळणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. डावखुऱ्या फलंदाजांसाठी एका बाजूने खेळपट्टी कोरडी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर उपकर्णधार लोकेश राहुल याने सांगितल्याप्रमाणे रिव्हर्स स्विंग येथे महत्त्वाचा ठरू शकतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sYEcdBN

No comments:

Post a Comment