म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय राऊत हे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त झाले आहेत. त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते, महाराष्ट्राला राऊत यांनी गरज आहे. त्यांच्याशिवाय रोज सकाळी महाराष्ट्राचे मनोरंजन होणार नाही. त्यामुळे एक डॉक्टर या नात्याने मी त्यांच्या उपचारासाठी एक चांगला डॉक्टर शोधणार आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना चिमटे काढले. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाच्या शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राज्यात सध्या ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यात राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असून, दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच याबाबत पोलिस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राऊत यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली होती. तसेच राऊत यांनी केलेल्या या आरोपांनंतर नाशिक दौऱ्यात त्यांना वाढीव सुरक्षा देण्यात आली होती.अंबरनाथ नगरपालिकेत प्राचीन शिवमंदिर परिसर प्रकल्पाबाबतच्या पत्रकार परिषदेत डॉ. श्रीकांत शिंदे यांना माध्यमांनी राऊत यांच्या आरोपाबाबत विचारले असता, त्यांनी राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. राज्याला राऊत यांची गरज आहे. त्यांच्यामुळे राज्याचे रोज सकाळी मनोरंजन होते. मात्र राऊत हे सध्या स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त झाले आहेत. ते आभासी विश्वात जगत असून मला त्यांची काळजी वाटत आहे, असे ते म्हणाले.त्यांना वेगवेगळे भास होतायत...राऊत हे पोलिस चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र देतात. दुसरीकडे आपल्या जबाबात माझ्यावर शाईफेक केली जाईल किंवा धक्काबुक्की केली जाईल असे सांगतात. मात्र त्यांचे सहकारी सहायक संपादक चिंदरकर पोलिसांना दिलेल्या जबाबाबत सांगतात की मी त्यांना फक्त काळजी घ्या, असे सांगितले होते. मी कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा ती व्यक्ती काय करणार हे म्हटले नव्हते, असे चिंदरकर यांनी जबाबात सांगितल्याचे खासदार डॉ. शिंदे यांवेळी म्हणाले. त्यामुळे संजय राऊत यांना वेगवेगळे भास होत असल्याने मला त्यांची काळजी वाटते, असे ते म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FZd7gsm
No comments:
Post a Comment