म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याची ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी झाली आहे. यासंबंधी गळतीच्या दुरुस्तीचे काम ३१ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३१ मार्चपासून पुढील ३० दिवस १५ टक्के पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई पालिकेने दिली आहे. मुंबई पालिकेकडून ठाणे शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबतही ही कपात लागू राहील.मुंबई महापालिका अंतर्गत मुंबई शहर व उपनगराच्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणीपुरवठा हा भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्के पाणीपुरवठा मुख्यत्वे ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. दुरुस्तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणे व त्या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविणे आवश्यक आहे. पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी काही अत्यावश्यक बदल करणेही गरजेचे आहे.पर्यायी व्यवस्थेस तांत्रिक मर्यादापर्यायी व्यवस्थेचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यास तांत्रिक कारणास्तव मर्यादा आहेत. त्यामुळे सध्या भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्या प्रमाणाइतके पाणी पोहचविणे व प्रक्रिया करणे शक्य होणार नसल्याचे मुंबई पालिकेने म्हटले आहे. हे लक्षात घेऊन मुंबई पालिकाक्षेत्रासाठी आणि मुंबई पालिकेतर्फे ठाणे शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३१ मार्चपासून एक महिनाभर १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. या कपातीमुळे मुंबईकरांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ifSrXGU
No comments:
Post a Comment