अमरावती: शहरात सातत्याने मुलींची छेड काढल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना शहरातील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला एका रोड रोमिओने 'तुझा खेळ खल्लास; आता तू मेलीस!' अशी गर्भित धमकी दिली आहे. धामणगाव रेल्वे येथील एका शाळेसमोर हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. संबंधित विद्यार्थिनी त्या माथेफिरूला ओळखत नसल्याचं सांगितल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध धमकी, पोक्सो आणि विनयभंग अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर घरी जाण्याकरिता व्हॅनची वाट पाहत शाळेसमोरच उभी होती. यावेळी मुलांचं टोळकं तिच्यावर लक्ष ठेवून होतं. ती शाळेच्या गेटपुढे येताच त्या टोळक्यातील एका रोड रोमिओने पीडित अल्पवयीन मुलीच्या अंगावर एक चिठ्ठी फेकली. या घटनेने मुलगी घाबरली. तिने ती चिठ्ठी उचलली आणि वाचली. ती चिठ्ठी वाचून ती नखशिखांत हादरली. मोठे धाडस करून ती कशीबशी घरी पोहोचली. घरी परतल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला. घरच्यांनी तिला धीर देत सायंकाळच्या सुमारास दत्तापूर पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत तिचा जबाब नोंदवला. याचा तपासा करत असताना जेव्हा पोलिसांनी ती चिठ्ठी तपासली तेव्हा त्यात लिहिले होते की, "तुम्हाला खल्लास करतो. उद्यापर्यंत तुमचा परिवार खतम. तू तुझ्या बापाला सांगितले वाटते. आता तो मरते. चाललो आम्ही त्याला पाहायला. याचा विचार करशील. तू मरतेस आता. तू माझा खेळ खतम केलास", असा धमकीचा मजकूर त्या चिठ्ठीत होता. दत्तापूर पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली असून, त्या अज्ञात आरोपींचा शोध चालविला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Tqj2Agp
No comments:
Post a Comment