नागौर: भारतात लग्न म्हटलं की सगळे विचारतात किती खर्च आला. त्याला कारणंही तसंच आहे. आपल्याकडे लग्न म्हटलं की अमाप पैसा उधळला जातो. अनेकदा या महागड्या लग्न समारंभांची चर्चाही होते. सध्या अशाच एका लग्न समारंभाची चर्चा होत आहे. जिथे लग्नात मुलीला तब्बल ३ कोटींच्या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील ही घटना असल्याची माहिती आहे. येथे वधूचे आजोबा आणि काका हे तब्बल ३ कोटी रुपयांच्या भेटवस्तू घेऊन लग्न समारंभात पोहोचले. त्यात ८१ लाख रुपये रोख रक्कम, दागिने, जमिनीची कागदपत्रे आणि बरंच काही होते. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण नागौर जिल्ह्यातील देह तहसीलमधील बुरडी गावातील असल्याची माहिती आहे. घेवरी देवी आणि भंवरलाल पोतालिया यांची मुलगी अनुष्काचा बुधवारी विवाह संपन्न झाला. हा सोहळा भव्य होता. पण, लग्नापेक्षा अधिक चर्चा ही या भेटवस्तूंचीच झाली. अनुष्काचे मामा भंवरलाल गरवा आपल्या तीन मुलांसह हरेंद्र, रामेश्वर आणि राजेंद्रसह अनुष्काच्या घरी पोहोचले. त्यांच्या हातात एक मोठे भांडे होते ज्यात भेटवस्तू ठेवलेल्या होत्या. तिघांनी मिळून ८१ लाख रुपयांची रोकड भाचीच्या हातात दिली. त्याशिवाय, नागौरमध्ये रिंगरोडवर एक प्लॉट भाचीच्या नावावर केला. त्याची किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ४० तोळं सोनं आणि तीन किलो चांदीही भेट म्हणून देण्यात आली. तसेच, धान्याने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर आणि स्कूटीही त्यांनी दिली या सर्व भेटवस्तू लग्नातील 'मायरा' या विधीदरम्यान देण्यात आल्या आहेत. राजस्थानमध्ये लग्नाच्या वेळी मायरा हा विधी आहे. या विधीमध्ये, जेव्हा बहिणीच्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न असते, तेव्हा तिचा भाऊ त्यांना कपडे, दागिने इत्यादी अनेक भेटवस्तू देतो. तसेच बहिणीच्या सासरच्यांनाही भेटवस्तू देतो. यापूर्वीही नागौरमध्ये लग्नात लाखो रुपयांचा मायरा भरल्याचं समोर आलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kBXhYJi
No comments:
Post a Comment