अहमदनगर : शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. जमावाला पांगविण्यास पोलिसांना यश आले आहे. सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. तर दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.शेवगावमध्ये दगडफेक, तोडफोड, जाळपोळ सुरू असताना या दंगलीत शेवगाव पोलीस ठाण्याचे चार पोलीस जखमी झाल्याचे कळते आहे. अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला. पाथर्डी, नेवासा येथील अतिरिक्त कुमक दाखल होईपर्यंत शेवगाव पोलिसांनी खिंड लढवली. छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने निघालेली मिरवणूक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दाखल झाल्यावर हा प्रकार घडला आहे. अहमदनगरहून शेवगावला मोठा बंदोबस्त पाठविण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. शहरात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याचं बोललं जात आहे. यामुळे अफवांना पीक येऊन दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ झाली. गोंधळामुळे व्यावसायिकांनी दुकाने पटापट बंद केली. जमावाने यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली गेली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/D8Gs2eV
No comments:
Post a Comment