म. टा. खास प्रतिनिधी, : बोरिवलीमध्ये चोर समजून केलेल्या मारहाणीत प्रवीण लहाणे (२६) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. प्रवीणचा भाऊ सांताक्रूझ पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे.बोरिवली पूर्वेकडे वास्तव्यास असलेल्या भावाकडे सिन्नर येथून प्रवीण आला होता. बोरिवली परिसरात बुधवारी मध्यरात्री एकटाच फिरत असताना एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने त्याला अडविले. त्यांच्या प्रश्नाला नीट उत्तरे न मिळाल्याने सुरक्षारक्षकाला तो चोर असल्याचा संशय आला. त्याने चोर चोर ओरडत प्रवीणला मारहाण करण्यास सुरुवात केली.याचवेळी आणखी तीन नागरिक त्या ठिकाणी आले. त्यांनीही प्रवीणला मारहाण करीत त्याच अवस्थेत कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात नेले. मारहाण झाल्याने पोलिसांनी तत्काळ प्रवीण याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर प्रवीण याला पुन्हा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. काही वेळाने त्याच्या छातीत दुखू लागल्याने पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, यावेळी डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.पोलिस अधिकाऱ्याच्या भावाचा अशाप्रकारे मारहाणीत मृत्यू झाल्याने मुंबई पोलिस दल हादरून गेले आहे. प्रवीणला मारहाण झाल्याचे घटनास्थळ, मारहाण करणारे तसेच इतर साक्षीदार यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत सुरक्षारक्षकासह आणखी तिघांना अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Dn5WJ8X
No comments:
Post a Comment