नवी दिल्ली : येत्या रविवारी रंगणाऱ्या आयपीएल फायनलद्वारे यंदाचा विजेता मिळेलच; पण आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे भवितव्यही याच दिवशी ठरेल, अशी माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाचे चिटणीस जय शहा यांनी गुरुवारी दिली. बीसीसीआयतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएल फायनलसाठी आशिया क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहेच. त्या निमित्ताने ही मंडळी अहमदाबाद येथे आली की, आशिया कप आयोजनाचे भवितव्य स्पष्ट होईल. आशिया कपचे आयोजन १ ते १७ सप्टेंबरदरम्यान अपेक्षित आहे. ‘बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डांचे अध्यक्ष २८ मे रोजी आयपीएल फायनलसाठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजर राहणार आहेत. त्याचवेळी आम्ही आशिया कपचे भवितव्य, स्पर्धेचा कार्यक्रम, ठिकाण यासंदर्भात निर्णय घेऊ’, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र आशियाई क्रिकेट कौंसिलकडे आशिया कपसाठी ‘हायब्रिड मॉडेल’साठी परवानगी मागितली आहे. आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांना आयपीएल फायनलचे निमंत्रण गेले असले, तरी यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांना आमंत्रण आहे की नाही, याची माहिती मिळालेली नाही. ही स्पर्धा सप्टेंबरदरम्यान पाकिस्तानात रंगणार आहे. मात्र भारताने पाकिस्तानात लढती खेळण्यास आधीच नकार दिला आहे. त्यामुळे भारताच्या लढतीत ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत दुबईत खेळविण्याचा प्रस्तावही पाकिस्तानने ठेवला आहे. -आर्थिक मुद्दा महत्त्वाचाआशिया कपच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान लढती रंगणार. अन् यामुळे यजमानांना स्पर्धेतील ८० टक्के फायदा याच लढतींमुळे होणार, असा अंदाज आहे. या आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातूनच पाकिस्तानने यजमानपद आपल्याकडेच रहावे, या हेतूने भारताच्या दृष्टीकोनातून दोन पर्यायांचा कार्यक्रम आखला. यातील पहिल्या मुद्यानुसार भारतीय संघ आपल्या आशिया कपमधील सगळ्या लढती यूएईमध्ये खेळेल. तर इतर संघांच्या लढती पाकिस्तानात होतील. पाकिस्तानने सादर केलेल्या दुसऱ्या पर्यायानुसार भारताव्यतिरिक्त स्पर्धेतील चार गटसाखळी लढती पाकिस्तान होतील. अन् भारताच्या सामन्यांसह उर्वरित लढती, अंतिम फेरीचे आयोजन त्रयस्थ ठिकाणी होईल. यातील पहिला पर्याय आधीच नाकारण्यात आला असून दुसऱ्या पर्यायाबाबत अधिकृत निर्णय व्हायचा आहे. -असा असेल ढाचाभारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे संघ आशिया कपमध्ये भाग घेतील. एका गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या समावेश असेल, तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ असतील. गटातील अव्वल दोन संघ ‘सुपर फोर’मध्ये प्रवेश करतील. या सुपर फोरपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात किमान दोन लढती निश्चित होतील. ज्याचा आर्थिक फायदा स्पर्धेचे यजमान पाकिस्तानला होईल. अन् आशिया कपच्या अंतिम फेरीत पुन्हा भारत-पाकिस्तान आमने सामने आले तर ती प्रतिस्पर्ध्यांमधील एकाच स्पर्धेतील तिसरी लढत ठरेल. तसेही भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकला नाही, तरी आशिया कपची अंतिम फेरी पाकिस्तानऐवजी त्रयस्थ ठिकाणी घेण्याचाच आशियाई क्रिकेट कौन्सिलचा विचार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Fuotm13
No comments:
Post a Comment