Breaking

Thursday, May 25, 2023

Mumbai News : मुंबईत दोन दिवस पाण्याचा मेगाब्लॉक, महापालिकेचा निर्णय, दोन दिवस पाणी पुरवठा कुठं बंद राहणार? https://ift.tt/tRqLr9p

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दादर पश्चिम परिसरात १,४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. २७ मे रोजी सकाळी आठ वाजेपासून ते २८ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत दुरुस्ती काम करताना या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.दादर पश्चिममधील सेनापती बापट मार्ग आणि काकासाहेब गाडगीळ मार्ग यांच्या जंक्शनवर अस्तित्वात असलेल्या १,४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम जलअभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. २७ मे रोजी सकाळी ८ वाजता दुरुस्तीचे काम सुरू होईल. रविवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता ते पूर्ण होणार आहे. या कामांतर्गंत गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे याठिकाणी पाणी कपात घेऊन त्यानंतर नेमकी गळती शोधून दुरुस्ती पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या गळती शोधण्यासाठीचे प्राथमिक काम सुरू करण्यात आल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

या विभागात पाणीपुरवठा बंद

जी उत्तर विभाग - संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात २७ मे ला सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही. जी दक्षिण विभाग - डिलाइल रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरात २७ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.जी दक्षिण विभाग - ना. म. जोशी मार्ग, डिलाइल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबी घाट, सातरस्ता या परिसरात २८ मे ला पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OkdM75L

No comments:

Post a Comment