Breaking

Wednesday, May 31, 2023

Weather Alert : मुंबईकर उकाड्याने हैराण, रविवारी कुठे कोसळणार पाऊस? राज्यात आठवडाभर असं राहणार हवामान https://ift.tt/DtGhA5p

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईचा उकाड्याचा पार वाढत असतानाच, बुधवारी मुंबईच्या कमाल तापमानाने ३५ अंशांचा टप्पा पार केला. मात्र, कमाल तापमानापेक्षाही प्रत्यक्ष जाणीव अधिक तापमानाची होती, अशी भावना मुंबईकरांनी व्यक्त केली. मुंबईमध्ये अजूनही वळवाचा पाऊस आलेला नाही. त्यामुळे उकाड्याच्या त्रासामध्ये अधिक भर पडली आहे. वळवाचा पाऊस पडून गेला की, वातावरणात थोडासा गारवा पसरतो. मात्र, वळवाचाही पाऊस न आल्याने उकाड्याची वाढती जाणीव ही मुंबईकरांना अधिक अस्वस्थ करणारी आणि त्रासदायक ठरत असल्याचे दिसत आहे.मुंबईत सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मे महिन्यातील बुधवारचे कमाल तापमान हे दुसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते. गुरुवारीही कमाल तापमान चढेच असेल, असा अंदाज आहे. याआधी ११ मे रोजी मुंबईचे कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर १२ मे रोजी ३५.२ अंश सेल्सिअस होते. बुधवारचे सांताक्रूझ येथील तापमान हे सरासरीपेक्षा एका अंशाने अधिक असले, तरी हे तापमान उष्णतेच्या लाटेप्रमाणे तीव्र जाणवत होते असे मुंबईकरांनी सांगितले. दुपारच्या वेळी हवाही उष्ण जाणवत होती. लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांनीही लोकलचा प्रवास एखाद्या भट्टीतून केल्याप्रमाणे जाणवत असल्याची भावना व्यक्त केली. घरांमध्ये गारव्यासाठी पंखे पूर्ण वेगाने सुरू असले, तरी पंख्यांमुळे दिलासा मिळत नाही, अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवली. बुधवारी मुंबईच्या दिशेने येणारे वारे उत्तर आणि वायव्य दिशा येथून वाहत होते. त्यामुळे बुधवारी तापमानात अधिक वाढ नोंदली गेली. ही स्थिती गुरुवारीही कायम असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पाराही ३६ अंशांच्या आसपास असेल, असा अंदाज आहे. मुंबईत कुलाबा येथे बुधवारी कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे ६८ टक्के, तर सांताक्रूझ येथे ५८ टक्के आर्द्रता बुधवारी नोंदली गेली. आर्द्रता कमी असली, तरी उष्ण वाऱ्यांमुळे सरासरीपेक्षा एका अंशाने चढलेले तापमानाही मुंबईकरांना सहन करता आले नाही. वळवाची सर येऊन गेली की, हवेमध्ये किंचित गारवा पसरतो. हा गारवा प्रत्यक्ष पाऊस येईपर्यंत मुंबईकरांना काही काळ सोबत करतो. मात्र, या गारव्याअभावी अनेक मुंबईकरांनी बुधवारी एसीच्या वातावरणातून बाहेर पडावेसे वाटत नसल्याचे सांगितले. दुपारच्या वेळी प्रवास करणाऱ्यांनी घामाच्या धारा अनुभवल्या. रेल्वे स्थानकात जिने चढताना होणारी दमछाक, थोडेसे चालल्यानंतर येणारा थकवा, तहानेने व्याकुळ होणे अशीही लक्षणे अनुभवल्याचे काही मुंबईकरांनी सांगितले. बुधवारी जुहू विमानतळ येथे ३६.३, माटुंगा येथे ४०.९, राम मंदिर येथे ४७, सीएसएमटी येथे ३५.३, भाईंदर येथे ३५.७ तर कोपरखैरणे येथे ३८.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान स्वयंचलित केंद्रांवर नोंदले गेले. मुंबईमध्ये रविवारपर्यंत तरी कोरडेच वातावरण असेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मात्र हलक्या सरींची शक्यता आहे. राज्यात पारा चढलेलाप्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रातच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये २ ते ३ अंशांनी वाढू शकते. कोकण आणि गोव्यामध्ये उष्ण आणि आर्द्र वातावरण निर्माण होईल अशीही शक्यता आहे. त्याचा अनुभव बुधवारीही मुंबईमध्ये आला. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही उष्णतेची जाणीव होऊ शकते. विदर्भात मात्र कमाल तापमानात फारसा बदल आत्ता अपेक्षित नाही. तीन दिवसांनी दोन ते चार अंशांनी कमाल तापमानात वाढ होऊ शकते.बुधवारी राज्यातील कमाल तापमानअकोला - ४३.७अमरावती - ४३.४वर्धा - ४३.०जळगाव - ४२.७परभणी - ४२.७मालेगाव - ४२.६सोलापूर - ४२.५जेऊर - ४२.०नांदेड - ४१.६उदगीर - ४०.०नाशिक - ३९.३मे महिन्यातील पाऊस कुठे गेला?मे महिन्याच्या उत्तरार्धात अधूनमधून मेघगर्जनेसह पावसाची उपस्थिती मुंबईच्या वातावरणात सुखावणारी ठरते. मात्र, यंदा मे संपला, तरी असा मेघगर्जनेसह पाऊस मुंबईत अनुभवाला आलेला नाही. यासाठी अंदमानात रेंगाळलेला मान्सून, मान्सूनचे उशिरा आगमन आणि एन निनोचे वर्ष असे सगळे घटक कारणीभूत असल्याचे भारतीय हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. मार्च आणि एप्रिलमध्ये निर्माण झालेल्या वारा खंडितता प्रणालीमुळे अवकाळी पावसाचा उर्वरित महाराष्ट्रात अनुभव आला. मात्र, मुंबईत याचा फारसा परिणाम नव्हता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oLJAk6M

No comments:

Post a Comment