म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बकरी ईदनिमित्त मुंबई सेंट्रल येथील लॅमिंग्टन रोडवरील नथानी हाईट्स या इमारतीत बेकायदा पद्धतीने प्राण्यांची कत्तल केली जाणार असल्याची तक्रार करत काही रहिवाशांनी बुधवारी संध्याकाळी उशिरा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली.‘या इमारतीत बेकायदा कत्तल होणार नाही, याची खबरदारी महापालिकेने घ्यावी. संबंधितांनी महापालिकेकडून कायद्याप्रमाणे परवाना मिळवलेला नसेल तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने कत्तलीचे प्रकार रोखावेत. पोलिस आयुक्त किंवा नागपाडा पोलिस प्रमुखांनी पोलिस बळ पुरवावे’, असा आदेश न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने रात्री सव्वा आठच्या सुमारास दिला.हरेश जैन व अन्य काहींनी अॅड. सुभाष झा यांच्यामार्फत संध्याकाळी रिट याचिका केल्यानंतर खंडपीठाने रात्री याप्रश्नी तातडीची सुनावणी घेतली. या सुनावणीत अॅड. जोएल कार्लोस यांनी पालिकेची बाजू मांडली. ‘मंगळवारी सकाळी काहींनी प्राण्यांना इमारतीत आणून बांधल्याचे दिसले. त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर रहिवाशांची संमती मिळवली. कायद्याप्रमाणे पालिकेचा परवाना मिळवून विशिष्ट ठिकाणीच प्राण्यांची कत्तल करण्यास अनुमती असताना सोसायटीमध्येच कत्तल करण्याचा घाट घालण्यात आला. सोसायटीत अनेक लहान मुलेही असल्याने याचा त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधी पोलिसांकडे व नंतर पालिकेकडे तक्रारी केल्या. परंतु, केवळ तोंडी आश्वासने मिळाली. बुधवारी सकाळी काही प्राणी आणण्यात आले. म्हणून नाईलाजास्तव तातडीची याचिका करावी लागली’, असे म्हणणे याचिकाकर्त्यांतर्फे खंडपीठासमोर मांडण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yId9b6R
No comments:
Post a Comment