सातारा : कराड तालुक्यातील येरवळे येथील सूरज मधुकर यादव या जवानाचा आसामच्या धिमापूर येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेची माहिती रात्री उशिरा गावाकडे समजली. त्यामुळे गाव शोकसागरात बुडाले आहे. त्यांचे पार्थिव विमानाने उद्या पुण्यात आणण्यात येणार आहे. येथून ते गावाकडे नेण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजले.याबाबत ग्रामस्थ व नातेवाइकांकडून माहिती देण्यात आली आहे. कराड तालुक्यातील येरवळे गावचे सुपुत्र सूरज यादव हे चौदा वर्षांपूर्वी देशसेवेसाठी लष्करा दाखल झाले होते. काही वर्षे त्यांनी पुण्यात सेवा बजावली. त्यानंतर तीन महिने बरेली (उत्तर प्रदेश) येथून पुढे नागालँड (आसाम) याठिकाणी १११ इंजिनिअर रेंजमेंट विभागात ते कार्यरत होते. सूरज यांनी २०१८ मध्ये शांतिदूत म्हणून लष्कराच्या वतीने आफ्रिकेत कामगिरी बजावली होती. जवान सुरज यांनी रोइंगमध्ये राष्ट्रपती पदक पटकावले होते. सध्या धिमापूर या ठिकाणी सेवा बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. दूरध्वनीवरून रात्री अकराच्या सुमारास गावाकडे ही माहिती मिळाली. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. गावातील वातावरण सुन्न झाले असून नातेवाईक घरी येऊन माहिती घेत होते. यादव कुटुंबात एकूण दहा ते बारा जण आजी-माजी सैनिक आहेत. त्यापैकी सेवानिवृत्त मधुकर यादव यांचा सूरज हा एकुलता एक मुलगा होता. अतिशय शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. घरच्या सैनिकी परंपरेमुळे तेही भरती झाले होते. गणेश जयंतीला तीन महिन्यांपूर्वी ते गावी आले होते. दोन वर्षांनी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या निधनाने गाव व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव विमानाने उद्या पुण्यात तेथून गावाकडे येईल, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JRDiN4M
No comments:
Post a Comment