पुणे : कॅम्प परिसरात एका दुमजली इमारतीचा स्लॅब कोसाळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री ८:३०च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. मिळालेल्या फोटोच्या आधारे ही दुमजली इमारत पडण्याच्या स्थितीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यात दोन दिवस मोठा पाऊस झाल्याने स्लॅब कमकुवत होऊन पडला असावा, अशी शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेत स्टॅनली डिसोझा (वय ५० ) यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. तर जेरी डिसोझा (वय ६०) ह्या गंभीर रित्या जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. जेरी डिसोझा यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या कॅम्प परिसरात दस्तुर मेहेर रोड येथे एक ५० ते ६० वर्षे जुन्या दुमजली इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर घराचा स्लॅब कोसळला होता. घरात चार जण होते. यातल्या दोन जणांच्या अंगावर हा स्लॅब पडला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने रुग्णालयात पाठवले. मात्र यातल्या एका व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. जखमीवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहे. ही इमारत अंदाजे ५० ते ६० वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे इमारत पडण्याच्या स्थितीत असल्याची शक्यता अग्निशमन दलाचे अधिकारी रोहित रणपिसे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महानगरपालिकाने याचे तात्काळ दखल घेऊन इमारत दुरुस्त करावी किंवा जमीनदोस्त करावी, अशी सूचना अग्निशामक विभागाने पोलिसांना दिली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FYZqixN
No comments:
Post a Comment