अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांची कशा प्रकारे आर्थिक लूट केली जाते हे लाच लुचपत विभागाच्या कारवाई दरम्यान समोर आलं आहे. सातवी पासची टीसी देण्यासाठी चारशे रुपयांची लाच मागणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला एसीबीने शनिवारी रंगेहाथ पकडलं आहे. जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक शाळा येथे हा प्रकार घडला. वीणा नेम्मानीवार (वय ४१) असं मुख्याध्यापिकेचं नाव आहे.तक्रारदाराचा मुलगा हा किनवट शहरातील सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आहे. सातवी उत्तीर्ण झाल्याने त्याला पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे तक्रारदाराने शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा नेम्माणीवार यांच्याकडे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अर्थात टीसी देण्यासाठी विनंती अर्ज केला होता. मात्र, मुख्याध्यापिका टीसी देण्यासाठी सहाशे रुपयांची लाच मागितली. वारंवार विनंती करुनही शाळेच्या मुख्याध्यापिका या सतत पैशांची मागणी करत होत्या. शेवटी तडजोडीनंतर चारशे रुपये देण्याचं ठरलं. दरम्यान, तक्रारदाराने १६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १७ जून म्हणजे रोजी लाच मागणीची पडताळणी केली आणि त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाळेतच सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापिका नेम्माणीवार यांना रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे तक्रारदाराने मुख्याध्यापिकेकडे जेव्हा पैशांची पावती मागितली तेव्हा "पैशांची पावती कोणीही देत नाही", असं सांगत शासकीय पंचासमक्ष लाच स्वीकारली. लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मांजरमकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी किनवट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाच्या या कारवाई नंतर शाळेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cjXJw7k
No comments:
Post a Comment