म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अरबी समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याची चर्चा सोमवारी सोशल मीडियावर रंगली होती. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य चक्रीवादळाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांसंदर्भात जारी केलेले परिपत्रकही लोकांपर्यंत पोहोचले आहे. मात्र चक्रीवादळाच्या निर्मितीबद्दल अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईपर्यंत भारतीय हवामान विभागाकडून भाष्य करण्याबद्दल सावधगिरीची पावले उचलली जात आहेत. भारतीय हवामान विभागाने अद्याप चक्रीवादळाचा इशारा जारी केलेला नाही. मात्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किनारपट्टीवर सावधगिरी बाळगावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार सोशल मीडियावर चक्रीवादळाची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात बोलताना प्रादेशिक हवामान विभाग मुंबईचे अधिकारी सुनील कांबळे यांनी काही मॉडेलनुसार चक्रीवादळाची शक्यता वर्तवली जात असली तरी भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिलेला नाही, असे असे स्पष्ट केले. चक्रीय वात स्थितीनंतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईपर्यंत पुढील स्थितीबद्दल सांगितले जात नाही. मात्र चक्रीवादळाची शक्यता असेल तर त्याबद्दल योग्यवेळी पूर्वकल्पना दिली जाईल, असे ते म्हणाले. पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामान अंदाजासाठी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या मॉडेलमध्ये चक्रीवादळाबद्दल एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट केले. काही मॉडेलमध्ये तारखा वेगळ्या आहेत, काहींची दिशा तर काही मॉडेल या प्रणालीच्या तीव्रतेबद्दल वेगळी माहिती दर्शवत असल्याचे ते म्हणाले. यामध्ये भारतीय आणि परदेशी दोन्ही प्रकारच्या मॉडेलचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही एका मॉडेलच्या आधारे चक्रीवादळाबद्दलची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. 'भारतीय हवामान विभागाने ही प्रणाली तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत पोहोचण्याची शक्यताही कमी असल्याचे म्हटले आहे. मात्र कमी दाबाचे क्षेत्र या प्रणालीची व्यापकताही मोठी असते. त्यामुळे त्या अनुषंगाने मच्छिमारांना इशारे देण्यात आले आहेत. यासंदर्भात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चर्चा सुरू होती. ही प्रणाली ५ तारखेला चक्रीवादळात बदलेल, अशीही चर्चा झाली. मात्र तसे प्रत्यक्ष घडलेले नाही त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अद्ययावत माहिती पाहत राहावे', असे आवाहन त्यांनी केले. तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की त्यानंतर चक्रीवादळाचा पुढच्या प्रवासाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात होते. या प्रणालीवर हवामान विभाग लक्ष ठेवून असल्याचेही सांगण्यात आले. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा पूर्वानुमानानुसार रायगड जिल्ह्यामध्येही ९ तारखेपर्यंत कोरड्या वातावरणाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यामध्येही कोरडे वातावरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LlJhqPK
No comments:
Post a Comment