Breaking

Monday, June 5, 2023

मान्सून रखडण्याची चिन्हे , राज्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार, हवामान विभागाने म्हटलं... https://ift.tt/rREei1P

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यामध्ये ९ जून रोजी मान्सूनप्रवेश होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, सध्या देशात मान्सून प्रवेश जाहीर झाला नसल्याने पुढीच चार दिवसांमध्ये राज्यात मान्सूनप्रवेश होण्याची शक्यता कठीण आहे. मात्र, आठवडाअखेरीस कोकणामध्ये मान्सूनपूर्व सरींचा अनुभव येऊ शकतो.भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अद्ययावत अंदाज सोमवारी वर्तवला नाही. त्यामुळे ६ जूनला मान्सून देशात दाखल होईल का, याबद्दल साशंकता आहे. भारतीय हवामान विभागाने ४ जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार मान्सून आगमनाची तारीख चार दिवस पुढे-मागे होऊ शकते. त्यामुळे ८ जूनपर्यंत मान्सून प्रवेशाची शक्यता असेल, तर ९ जून रोजी महाराष्ट्रात पाऊस दाखल होणार नाही. अरबी समुद्रामध्ये एक चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. याच भागामध्ये येत्या चोवीस तासांमध्ये कबी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता पुढील ४८ तासांमध्ये वाढू शकते. या प्रणालीमधून येणारे वारे हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहणारे असतील. यामुळे किनारपट्टीवर आर्द्रता वाढून कोकण विभागात आठवड्याच्या अखेरीस पाऊस पडू शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला. हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे क्षेत्र उत्तर दिशेने प्रवास करण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या मागे नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवास होऊ शकेल. मंगळवारी निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा प्रवास यावर नैऋत्य मौसमी पावसाचे आगमन अवलंबून आहे, असेही या संदर्भात सांगण्यात येत आहे. यंदा वळवाचा पाऊस मुंबईमध्ये फारसा न अनुभवल्याने जून महिना सुरू झाला तरी अजून तीव्र उकाड्याची जाणीव कमी झालेली नाही. हा उकाडा दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याची मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस येणाऱ्या पावसाने उकाड्यापासून दिलासा द्यावा, एवढीच प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. एम. राजीवन म्हणाले, 'सात ते आठ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार होऊ शकते. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सुरुवातीला उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज असून, त्यासोबत मान्सूनच्या प्रवाहाला जोर येऊन मान्सूनची प्रगती पुन्हा सुरु होऊ शकेल. आठ जूनच्या दरम्यान केरळमध्ये चांगल्या पावसाची शक्यता मॉडेलमध्ये दिसत आहे.' वादळाबाबत भिन्न अंदाजअरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता काही हवामानशास्त्रीय मॉडेल वर्तवत आहेत. मात्र, दोन वेगवेगळ्या मॉडेलमधून वादळाचा मार्ग भिन्न दर्शवण्यात येत असल्याने मान्सूनची प्रगती वेगाने होणार की त्यात खंड पडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 'कमी दाबाच्या क्षेत्राचा विकास कसा होतो, यावर आयएमडी सातत्याने लक्ष्य ठेवून आहे. त्यात होणारे बदल वेळोवेळी प्रसिद्ध करत राहू,' असे 'आयएमडी'ने म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PwbmhlZ

No comments:

Post a Comment