जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथील तरुणाचा रेल्वेखाली आल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे. प्रवीण पितांबर मोरे-भिल (वय २१, रा. मोहाडी ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या महिन्यात प्रवीण याचा साखरपुडा झाला होता, अवघ्या काही दिवसांवर लग्न आले असताना तरुणाच्या मृत्यूने लग्न घरात शोककळा पसरली आहे.याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.प्रवीण पितांबर मोरे हा मोहाडी गावामध्ये आई-वडील, लहान भाऊ आणि बहिणीसह वास्तव्याला होता. प्रवीणचे वडील ट्रॅक्टर चालक असून गावातच मजुरी करतात. तर प्रवीण सुध्दा ट्रॅक्टर चालवून वडीलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावत होता. मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास प्रवीण हा घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत घरी परतला नव्हता. त्यामुळे कुटुंबियांकडून प्रवीण याचा शोध सुरु होता.मोहाडी गावाच्या पुढे सावखेडा शिवारातील रेल्वे पुलाजवळ खंबा नंबर ४२९/१२, डाऊन लाईन जवळ रेल्वे खाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती रेल्वे विभागाने बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला कळविली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरुन तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
ओळख पटविण्यासाठी वडिलांनी रुग्णालय गाठले...मृत तरुण मुलगाच निघाला...
मृताची ओळख पटविण्याचे काम पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे यांच्या माध्यमातून सुरु होते. याचदरम्यान प्रवीण याचा शोध घेत असलेल्या प्रवीणचे वडील पिंताबर पॅरेलाल मोरे यांना एका तरुणाचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मिळाली. त्यानुसार प्रवीणचे वडील पिंताबर यांनी मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी जिल्हा रुग्णालय गाठले. तसेच घटनास्थळी मिळून आलेली दुचाकी सुध्दा त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविली. यावरुन मृत हा प्रवीण असल्याची ओळख पटल्यानंतर प्रवीण याच्या वडीलांनी रुग्णालया हंबरडा फोडला. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी आणि गावातील नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करत आक्रोश केला. प्रवीण भिल याचा मे महिन्यात साखरपुडा झाला होता, जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे अवघ्या काही दिवसांनी प्रवीण याचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, प्रवीणच्या लग्नाची तयारी अन् घरात आनंद असतांना याच घरात प्रवीणच्या अचानकच्या दुर्देवी मृत्यूने शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी अनिल फेगडे आणि अनिल मोरे हे करीत आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yjpLUhg
No comments:
Post a Comment