विनीत जांगळे, ठाणे : कष्ट करून कुटुंबासाठी पै पै जोडणाऱ्या, मुलाने इंजिनीअर व्हावे, म्हणून राबणाऱ्या वडिलांवर आणि पर्यायाने कुटुंबावर आघात झाला. कंपनीत काम करत असताना यंत्रात हात अडकून त्यांनी पाचही बोटे गमावली. ऐन उमेदीच्या काळात झालेल्या या अपघातानंतर वडील यशवंत निमसे यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी पुन्हा काम सुरू केले. या मेहनतीची जाण ठेवत मुलगा युवराजनेही वडिलांचा हात हाती घेऊन यशाची कहाणी लिहिली. दहावीच्या परीक्षेमध्ये त्याने ९२ टक्के गुण मिळवत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, आता त्याला चिंता आहे आर्थिक संकटाची.ठाण्याच्या लोकमान्यनगरातील दाटीवाटीच्या वस्तीत राहणाऱ्या निमसे दाम्पत्याच्या युवराजला मेकॅनिकल किंवा कम्प्युटर इंजिनीअर व्हायचे आहे. ‘सध्या, युवराजचे वडील एका खासगी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी करतात. त्यांना महिन्याकाठी जेमतेम दहा हजार रुपये पगार मिळतो. तुटपुंज्या पगारात घर चालविण्यासह युवराजच्या शिक्षणाचा खर्च भागवताना त्यांचा जीव मेटाकुटीला येतो’, हे सांगताना युवराजच्या आई प्रमिला यांच्या बोलण्यातील कंप बरेच काही सांगून गेला.अभ्यासाचा ध्यास, कुटुंबाची साथचाळीत राहत असल्याने भोवतालचा गोंधळ, समोरच असलेल्या मैदानावरील गोंगाट, आजूबाजूचे आवाज यामुळे अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, अशी परिस्थिती होती. मात्र, ठाण्याच्या लोकमान्यनगरातील दाटीवाटीच्या वस्तीतच त्याने अभ्यासाचा ध्यास घेतला. त्याच्या प्रयत्नांना कुटुंबाची साथ मिळाली आणि यशाला गवसणी घातली.दहावीत ९२ टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या युवराज निमसे याच्या वडिलांनी अपघाताने आलेल्या अपंगत्वाचे दुःख बाजूला सारत मुलगा युवराजला सुरुवातीपासूनच उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न पाहिले. युवराजचे शिक्षण पोखरण रोड दोन येथील लिटिल फ्लॉवर शाळेत झाले. त्याची आई प्रमिला निमसे यांनीही घरच्या आर्थिक स्थितीला हातभार लावण्यासाठी लहान मुलांच्या घरगुती शिकवणी सुरू केल्या होत्या. पण काही वर्षांपूर्वीच आधीच छोट्या असणाऱ्या खोलीत युवराजच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये, म्हणून त्यांनी त्या बंद केल्या.‘पहिलीत असल्यापासूनच अभ्यासात सातत्य दाखवत युवराजने घरच्या परिस्थितीची जाण ठेवत मेहनत घेतली. आई-वडिलांचे कष्ट पाहून त्याने प्रेरणा घेतली आणि कुटुंबाची ही परिस्थिती बदलण्यासाठीच तो झटत आहे. मला त्याचा अभिमान आहे’, असे सांगताना प्रमिला यांचे डोळे पाणावले भरून जातात. लेकाला मिळालेल्या भरघोस गुणांचा आनंद साजरा करायचा की त्याच्या पुढील शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत उभी कशी करायची, अशा द्विधा मनस्थितीत निमसे कुटुंबीय सापडले आहेत.युवराजच्या घरासमोरच मैदान आहे. त्यामुळे सतत मुलांच्या खेळण्याचा आवाज, आजूबाजूच्या गोंगाटातही त्याने दहावीत मोठे यश मिळवले. घरात मार्गदर्शन करणारे कोणीच नसल्यामुळे परिचयातील एकाने त्याला इंजिनीअर होण्याचा सल्ला दिला. युवराजनेही ते स्वप्न आपले म्हणत इंजिनीअर होण्यासाठी कष्ट घेण्यास सुरुवात केली. इंजिनीअर झाल्यानंतर घरची परिस्थिती बदलेल, असा ठाम विश्वास त्याला आहे. आता हे स्वप्न जगणाऱ्या युवराजच्या पंखांमध्ये बळ देण्याची आवश्यकता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KFqH3BG
No comments:
Post a Comment