छत्रपती संभाजीनगर: गेल्या वर्षभरापासुन विभक्त राहणाऱ्या एका घराचा लॉक तोडून, घरातून पन्नास हजाराची रोख रक्कमसह घर उपयोगी वस्तु चोरी झाल्याची घटना घडली. सदर चोरी ही विभक्त पतीच्या साथीदारांनी केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून पतीसह अन्य चार जणांच्या विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शक्तीनगर, देवप्रिया हॉटेलच्या पाठीमागे राहणाऱ्या हमिदा खातून तौफिक खान (वय ३०) यांचे त्यांचे पती तौफिक अहेमद यांच्यासोबत कौटुंबिक वाद सुरू होते. या वादामुळे त्या एक वर्षांपासून वेगळे राहत होत्या. या दोघांमधील वाद वाढले होते. या दोघांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हमिदा खातून या १६ जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास जयसिंगपुरा येथील रुग्णालयात उपचारासाठी गेले होते.हमीदा खातून यांचे घर बंद असल्याची संधी साधून पती तौफिक अहमद आणि त्याचा साथीदार सलीम कुर्चीवाला, अकबर अली कुर्चीवाला, दीर शकील अहमद यांनी अमित बांगर यांना बोलावून घेतले. एका कटरच्या साह्याने त्यांनी घराचे लॉक उघडले. या घरातून गॅस सिलिंडर, फ्रीज, भांडीकुंडी, सोफासेट, पाण्याची मोटार असे दोन लाखांचे साहित्य आणि कपाटातील ५० हजारांची रोख रक्कम चोरून नेली.हमिदा खातून या रुग्णालयातून घरी आल्या असता, घराचे कुलूप तुटलेले दिसले; तसेच घरातील साहित्य गायब झालेले दिसले. त्याचप्रमाणे घरात दोन जण दारू पीत बसलेले असल्याचे दिसले. त्यांनी घटनेची माहिती क्रांती चौक पोलिसांना दिली. एका उपनिरीक्षकाने घटनास्थळी धाव घेऊन घरातील दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांनी घरातील साहित्य चोरी करण्यासाठी सलीम कुर्चीवाला, तौफिक अहमद यांनी कट रचून गुंडांना ७५ हजार देण्यास सांगितले. काम करण्यापूर्वी २५ हजार, तर काम झाल्यानंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले असल्याचे सांगितले. चोरी केलेले साहित्य एका टेम्पोने रेल्वेस्टेशन येथील रिव्हेरा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लपवून ठेवल्याची कबुलीही त्यांनी दिली. ही चोरी घटना १६ जून रोजी दुपारी घडली होती. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा नोंदविण्यासाठी महिलेची धावाधावया प्रकरणात हमिदा खातून यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर काही मध्यस्थांच्या मार्फत हामीदा खातून यांचे सामान मिळवून देतो, गुन्हा दाखल करू नका, असे आमिष हमिदा यांना दाखविण्यात आले. काही दिवसांनंतरही सामान परत न आल्याने हमिदा खातून यांनी तक्रार करण्यास पाठपुरावा सुरू केला. याबाबत उपायुक्तांनाही निवेदन दिले. पोलिस उपायुक्त यांच्या आदेशानंतर या चोरी प्रकरणात हमिदा खातून यांच्या पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हमिदा खातून यांचे घर फोडण्यापूर्वी चोरट्यांनी घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. त्यानंतर त्यांनी घराचे कुलूप कटरने तोडले. मात्र, लॉक तोडण्यापूर्वी चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HABYsG8
No comments:
Post a Comment