तैपई : एचएस प्रणॉय, अनुभवी परुपल्ली कश्यप यांनी बुधवारी तैवान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यातही विशेष म्हणजे या दोघांनीही आपापल्या लढती सहज आणि कमी वेळात जिंकल्या. जागतिक रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयने अवघ्या २६ मिनिटांत यजमान तैवानच्या लिन यू सीन याला २१-११, २१-१० असे हरवून विजयी सलामी दिली. प्रणॉयने या सामन्यात आक्रमक खेळ केल्याचे पाहायला मिळाले. कारण प्रणॉयने पहिल्याच गेममध्ये दमदार आघाडी घेतली होती. त्यावेळी तो हा गेम सहज जिंकेल, असे वाटले होते. पहिला गेम जिंकल्यावर त्याचे मनोबल चांगलेच उंचावलेले पाहायला मिळाले. या गोष्टीचा फायदा त्याला दुसऱ्या गेममध्ये झाला. दुसऱ्या गेममध्ये त्याने अधिक आक्रमक खेळ केला आणि सुरुवातीला चांगली आघाडी घेतली होती. ही आघाडी त्याने शेवटपर्यंत कायम ठेवली आणि दुसऱ्या गेमसह सामनाही जिंकला.या सुपर ३००च्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रणॉयचा सामना होईल तो इंडोनेशियाच्या टॉमी सुगीयार्तो याच्याशी. माजी राष्ट्रकुलविजेत्या परुपल्ली कश्यपने जर्मनीच्या सॅम्युएल सियाओचा २१-१५, २१-१६ असा फडशा पाडला. कश्यपला दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या सू लि यांगशी दोन हात करावे लागतील. मिथुनचा कडवा प्रतिकारभारताचा राष्ट्रीय विजेता मिथुन मंजूनाथचा पराभव झाला; पण त्याने आपल्या खेळाने मने जिंकली. मिथुनला दुसऱ्या सीडेड चो तिएन चेन (तैवान) याचे आव्हान १८-२१, २१-१४, १६-२१ असे मोडून काढले. मिथुनने चेनला एक तास, ११ मिनिटे झुंजविले. महिला एकेरीत तान्या हेमंतने विजयी सलामी दिली. तिने हंगेरीच्या अग्नेस कोरोसीला २१-७, २१-१७ असे नमवले. मात्र पुढील फेरीत तिला आव्हान असेल ते अव्वल सीडेड तैइ झ्यू यिंग हिचे. तैइ ही जागतिक स्पर्धा आणि ऑलिम्पिकमधील उपविजेती आहे. मिश्र दुहेरीत सिक्की रेड्डी आणि रोहन कपूर यांनी भारताच्याच नवनीत बोक्का-प्रिया कोनजेंगबम यांच्यावर २१-१४, २१-१७ अशी मात केली. दरम्यान एस शंकर, किरण जॉर्ज, मीराबा लुवांग मैसनाम, सतीशकुमार करुणाकरन, ऋत्त्विका शिवानी गड्डे, आकर्षी कश्यप यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lDBEvb7
No comments:
Post a Comment