म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : स्वामी समर्थनगर ते विक्रोळीदरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो ६ मार्गिकेवरील १८ गाड्यांची तयारी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. यामध्ये १०८ डब्यांचा समावेश असेल. त्यावर ९८९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.मेट्रो ६ ही पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगरांशी जोडणारी उन्नत मार्गिका आहे. १५.८ किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण १३ स्थानके आहेत. या स्थानकांदरम्यान सहा डब्यांची मेट्रो धावणार आहे. या मेट्रोचे डबे पुरविण्यासह त्यांची चाचणी करणे व मेट्रो चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी एमएमआरडीएने निविदा काढली आहे. निविदेनुसार, प्राधिकरण पहिल्या टप्प्यात १०८ डबे खरेदी करणार आहे. सहा डब्यांनुसार एकूण १८ गाड्या याअंतर्गत मागविल्या जात आहेत. त्यासाठी ९८९.८७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. संबंधित कंत्राटदाराला हे डबे यशस्वी चाचणीसह तसेच चालकांच्या प्रशिक्षणासह १५९ आठवड्यांत पुरवायचे आहेत. ३१ जुलै २०२३ ही निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे.या मेट्रो गाडीच्या सहा डब्यांची एकूण प्रवासी हाताळणी क्षमता २,२८० इतकी असावी. त्यामध्ये ३१६ प्रवासी बसू शकतील. तसेच कमाल ताशी १५० किमी, सरासरी ताशी ९० किमी व वळणदार रस्त्यावर सरासरी ताशी ३५ ते ५० किमी वेगाने ही गाडी धावू शकणारी असावी, असे एमएमआरडीएने म्हटले आहे. या मार्गिकेवरील फलाटांची लांबी १३८.२० मीटर व रुंदी ८ ते १२ मीटर असेल. तसेच रेल्वे रुळांपासून उंची १०७५ ते १०९५ मिलिमीटर इतकी आहे. हे सर्व ध्यानात घेत डब्यांची आखणी करावी, असे एमएमआरडीएने निविदा दस्तावेजात म्हटले आहे.कारशेड तयार होणे आवश्यकमेट्रो ६चे कारशेड अर्थात गाड्या दुरुस्ती कारखाना कांजुरमार्ग येथील जमिनीवर होणार आहे. ही १५ हेक्टर जमीन राज्य सरकारने एमएमआरडीएकडे वर्ग केली असली तरीही केंद्रीय मीठ आयुक्तालयाचा त्यावर आक्षेप आहे. मीठ आयुक्तालयाने सर्वेक्षण रोखले आहे. या स्थितीत पुढील ३९ महिन्यांत गाड्या दाखल होताना त्याआधी कांजुरमार्ग येथे कारशेड उभे करण्याचे आव्हान एमएमआरडीएसमोर आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Qp94BNK
No comments:
Post a Comment