मुंबई : मध्यरात्री प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रक आणि बसचालकांना झोप लागू नये, यासाठी ‘चालक सूचना अलार्म’ यंत्रणा बसविण्याच्या सूचना दोन वर्षांपूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र सत्ताबदलानंतर चालक सूचना यंत्रणा रखडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर एक जुलैला झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. बसचा टायर फुटून अपघात झाल्याचे बसचालकाचे म्हणणे आहे. मात्र, बुलढाणा आणि अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार टायर फुटल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. यामुळे मध्यरात्री चालकाला झोप लागल्याने भीषण अपघात झाल्याची शक्यता अधिक आहे.सन २०२० मध्ये राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहात चालकांना झोप लागल्यास त्याची सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाय करावेत, अशी सूचना सप्ताह बैठकीत करण्यात आली. या सूचनेनुसार परिवहन विभागाने खासगी कंपनीशी बैठक घेत कार्यवाही सुरू केली. बस-ट्रक चालकाच्या केबिनमध्ये सेन्सरआधारित कॅमेरे बसवून त्या मदतीने चालकांच्या डोळ्याची उघड-झाप अनियमित झाल्यास किंवा चालकाला डुलकी लागल्यास अलार्मने चालकांची झोप उडवण्याचे काम ही यंत्रणा काम करणार होती. सॉफ्टवेअर आधारित यंत्रणेसाठी खासगी कंपनीशी करार करून चाचणी सुरू करण्यात आली. मात्र ही यंत्रणा लागू झालेली झाली नाही. दरम्यान सत्ताबदल झाल्यानंतर हा प्रकल्पच पूर्णपणे बारगळला, असे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. टायर फुटल्यानंतर घटनास्थळावर रबरचे तुकडे किंवा टायरचे रस्त्यावरील निशाण दिसून आलेले नाही. महामार्गावरील कारंजा लाडपासून अपघाताचे ठिकाण यांच्यात अंतर १५२ किमीचे आहे. हे अंतर २ तास २४ मिनिटांत पूर्ण करण्यात आले. यामुळे गाडीचा वेग ताशी ७० किमी असावा. बसचे योग्यता प्रमाणपत्र मार्च २०२४ पर्यंत वैध असल्याने टायर फुटणे, एक्सेल तुटणे किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे अपघात झाल्याचे दिसून आले नाही, असा अहवाल अपघाताची प्राथमिक पाहणी करणाऱ्या अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/l4DwgeU
No comments:
Post a Comment