म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘आज आकाश निरभ्र असेल’ असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त होतो आणि त्या दिवशी पाऊस कोसळू लागतो. हवामान विभागाचे पावसाळी अंदाज अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. याच अंदाजांचा आधार घेत पश्चिम रेल्वेने घाईत रविवारी लोकल, मेमू, एक्स्प्रेस रेल्वे फेऱ्या रद्द केल्या खऱ्या. यासाठी मान्सून सावधगिरी (मॉन्सून प्रिकॉशन) असे कारणही पश्चिम रेल्वेने दिले. परंतु, हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी रेल्वेचा दावा खोडून काढणारा पावसाळी अंदाज ट्विटरवर मांडला. यानंतर, मुसळधार पावसामुळे नव्हे, तर पावसाळी पूर्व कामासाठी गाड्या रद्द केल्याचे स्पष्टीकरण देण्याची वेळ रेल्वेवर आली.पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लोकल, मेमू, शटल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती दिली गेली. यात चर्चगेट ते डहाणू रोड, चर्चगेट ते विरार आणि अन्य मार्गावर एकूण १२ लोकल फेऱ्या, वांद्रे टर्मिनस ते सुरत सहा शटल आणि आठ मेमू फेऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हे ट्विट करण्यात आले. हे ट्विट रविवार सकाळपर्यंत व्हायरल झालं. केवळ मुसळधार पावसाचा अंदाज म्हणून रेल्वेगाड्या रद्द करणे हे अत्यंत चुकीचे असल्याची प्रतिक्रिया डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेने जाहीर केली. अन्य प्रवाशांनी रेल्वेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी रेल्वे व्यवस्थापक ट्विट आणि १ ते ५ जुलै असा अंदाज याचे फोटो ट्विट केले. माझ्या माहितीत असे आहे की पालघर मधील मुसळधार पावसाच्या काही चुकीच्या अलर्टमुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. हवामान विभागाने जारी केलेले अलर्ट पहावे, असा मेसेजही त्यांनी ट्विट केला.आधी प्रवासी आणि त्यानंतर थेट हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख होसाळीकर यांनीच खरं-खोटं केल्याने रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अखेर मान्सूनसंबंधी रेल्वे देखभालीची कामे करण्यासाठी मोजक्या रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सांगत पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून वादावर पदडा टाकण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oyCKlAJ
No comments:
Post a Comment