म. टा. वृत्तसेवा, उरण/पनवेल/अलिबाग : दरड कोसळल्याने उद्ध्वस्त झालेल्या पुणे जिल्ह्यातील माळीण आणि महाडमधील तळीये या गावांच्या वेदनादायी आठवणी ताज्या करणारी दुर्दैवी घटना बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीत घडली. खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या या वस्तीवर दरड कोसळून सुमारे ३५ ते ४० घरे दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे झोपेत असलेले हे गाव अक्षरश: होत्याचे नव्हते झाले. ४८ कुटुंबांतील २२९ आदिवासी या गावात राहत होते. यापैकी काहींनी यातून कसाबसा जीव वाचवला, परंतु शेकडो आदिवासी या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते. अवघ्या काही तासांमध्ये अत्यंत जलगतीने बचाव पथके घटनास्थळी पोहोचल्यामुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत १०३ जणांना ढिगाऱ्याखालून जखमी अवस्थेत सुटका करण्यात आले. परंतु १६ जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला. या गावच्या बचावासाठी जाणाऱ्या नवी मुंबई अग्निशमन दलाचा एक जवान ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडला. घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळातील मंत्री आणि विरोधीपक्षातील नेत्यांनीही घटनास्थळी जाऊन बचावलेल्यां जीवांच्या जखमांवर सहानुभुतीची फुंकर मारण्याचा प्रयत्न केला.गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात ४०० मिमीपेक्षा अधिक पाऊस होत होता. अशा धुवाधार पावसामध्ये खालापूर तालुक्यातील चौकजवळील इर्शाळगडावर असलेल्या वाडीवर रात्री दहाच्या सुमारास दरड कोसळल्याने हाहाकार माजला. या वेळी इर्शाळवाडी येथील सुमारे ४५ घरांमध्ये २२९ रहिवासी वास्तव्यास असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. रात्रीच्या सुमारास वाडीवरील बहुतांश रहिवासी हे झोपी गेले होते, तर काही लहान मुले ही जवळच असलेल्या बंद शाळेच्या आवारात झोपली होती. संपूर्ण गाव निद्रावस्थेत असताना या वाडीवरील बहुतांश घरे दरडीखाली गेली. गावाजवळ असलेल्या शाळेच्या आवारात झोपलेल्या चिमुकल्यांनी दरडीचा आवाज ऐकला आणि आपल्या आईवडिलांच्या शोधासाठी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काहींनी मदतीसाठी जवळच्या वाडीच्या दिशेने धाव घेतली. पोलिस आणि जवळच असलेल्या वाडीवरील रहिवाशांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. या वेळी खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या सामाजिक संघटनेचे गुरुनाथ साठीलकर आणि त्यांच्या यशवंती ट्रेकर्सच्या सदस्यांनी तत्काळ धाव घेऊन रात्री दीडच्या सुमारास मदतकार्याला सुरुवात केली. या वेळी खोपोली, खालापूर, कर्जत येथील अनेक रुग्णवाहिका आणि सामाजिक कार्यकर्तेदेखील मदतकार्यासाठी पोहोचले होते.धुवाधार कोसळणारा पाऊस आणि रात्रीच्या अंधारात अडीच ते एकर परिसरात सुमारे ३० ते ४० फूट उंचीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना वाचवण्यामध्ये अनेक अडथळे येत होते, असे बचाव पथकातील सदस्यांनी सांगितले. या वाडीवरील घरांपैकी अवघी पाच-सहा घरे उभी असल्याचे दिसून येत होते. अपघातस्थळावर वाहन पोहोचणे कठीण असल्याने बचाव पथके आणि एनडीआरएफ पथकांना मातीचे ढिगारे हाताने बाजूला करण्याचे कठीण काम करावे लागत होते. गुरुवारी सकाळच्या सुमारास एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला होता. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत १०३ रहिवाशांना ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे, अनिल पाटील, अदिती तटकरे, आंबादास दानवे, अदित्य ठाकरे अशा लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी पोहोचून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जखमींना पनवेल आणि नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. एकाच ठिकाणी दफनबचावकार्य सुरू असताना दुर्दैवाने जे मृतदेह हाती लागले, त्यांचा दफनविधी करण्याचे ठरल्यानंतर खड्डे खोदण्यात आले. पाऊस सुरू असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत होते. ते पाणी आम्ही उपसत होतो. या कठीण प्रसंगात काळजावर दगड ठेवून ते मृतदेह दफन केले, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.एमजीएम रुग्णालयातही नेत्यांची गर्दी...कामोठे येथे उपचार घेत असलेल्या यशवंत मोरे (वय ३७) या जखमीला पायाच्या डाव्या खुब्यात मार लागला आहे, तर प्रवीण पारधी (वय २१) याला विटांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे डोके आणि पाठीला मुका मार लागलेला आहे. दोघांचीही प्रकृती व्यवस्थित असून, त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या नियंत्रणाखाली उपचार सुरू आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत, महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट घेऊन जखमींची विचारपूस केली.बचावकार्यात अनेक अडथळे...बचावकार्यासाठी तैनात करण्यात आलेल्या एनडीआरएफसोबत रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय नवले, प्रांताधिकारी अजित नैराळे, राहुल मुंडके, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी आदी मध्यरात्रीपासून काम करीत होते. सकाळी सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अनेक अडथळे होते. प्रचंड चढण चढून चालणे अवघड असल्यामुळे यंत्रणा पोहोचवता आल्या नसल्याचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय नवले यांनी सांगितले.शून्य ते सहा महिन्यांची २५ बालके४८ घरे असलेल्या इर्शाळवाडीत २८८ नागरिक राहत होते, या नागरिकांमध्ये शून्य ते सहा महिन्यांच्या तब्बल २५ बालकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यातील अनेक बालके ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Y1VvJMh
No comments:
Post a Comment