म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे शनिवारी ८ जुलैला तलावातील पाणीसाठा ३ लाख १२ हजार २५१ दशलक्ष लिटर म्हणजे २१.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतका हा साठा आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने तलावांतील पाणीसाठा एक लाख दशलक्ष लिटरच्याही खाली गेला होता. त्यामुळे राखीव कोट्यातील पाण्याचा वापर सुरू करावा लागला होता. ३० जून रोजी तलावांत १ लाख ५७,४१२ दशलक्ष लिटर म्हणजे पुढील ४० दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पालिकेने पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ होते आहे.यंदाच्या पावसाळ्यात ८ जुलै रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सातही तलावामध्ये ३ लाख दशलक्ष लिटरहून अधिक पाणीसाठा झाला आहे. २०२२ च्या तुलनेत हा साठा सुमारे ४ टक्क्यांनी कमी आहे. दरम्यान, मुंबईला भातसा तलावातून दररोज एक हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हा तलाव भरणे मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहे. तलाव क्षेत्रात आतापर्यंत ६०० ते १३०० मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे पालिकेच्या जल अभियंता विभागाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
तुळशी तलावांत सर्वाधिक पाऊस
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक १,२५८ मिमी इतका पाऊस तुळशी तलावात पडला असून त्यापाठोपाठ मोडकसागरमध्ये १०६६ मिमी, विहार ९४९ मिमी, तानसा ७३८ मिमी, भातसा ७६० मिमी, मध्य वैतरणा ६५८ मिमी, तर अप्पर वैतरणा तलावांत ५९१ मिमी इतका पाऊस पडला आहे.तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर व टक्के)मोडकसागर ५९,२३९ (४५.९५)तानसा ६६,७९८ (४६.०४)मध्य वैतरणा ५७,०५५ (२९.४८)भातसा १,१२,३६० (१५.६७)विहार ११,९५८ (४३.१७ )तुळशी ४,८४१ (६०.१७)from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/f1TVw0Y
No comments:
Post a Comment