म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहराच्या विविध भागांत कोयता नाचवित दहशत पसरविणाऱ्या ‘गँग’चे पेव फुटल्याचे चित्र सातत्याने दिसले. या अल्पवयीन, नीट मिसरूडही न फुटलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ही (मकोका) प्रभावहीन ठरल्याने पुणे पोलिसांनी थेट पोलिसी खाक्या दाखविण्यासच सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून थेट गोळीबाराचा सराव सुरू केला आहे.सदाशिव पेठेतील तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. पुणे पोलिसांना या घटनेमुळे नामुष्की सहन करावी लागली. किरकोळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींकडून कोयते हाती घेऊन दहशत माजविण्याच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मकोका’नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी पदभार घेतल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत ३४ कारवाया ‘मकोका’नुसार केल्या असून, दोनशेहून अधिक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. असे असले तरी कोयता गँगची दहशत कमी झालेली नाही.या पार्श्वभूमीवर आयुक्त आणि सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक कारवायांसह ‘बेसिक पोलिसिंग’कडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी गेल्या आठवडाभरापासून सराईतांची धरपकड सुरू आहे. त्यांच्याकडून ठिकठिकाणच्या नव्या ‘भाईं’ची कुंडली गोळा करण्यात येत आहे. दुसरीकडे, पोलिस अधिकाऱ्यांनी नुकताच गोळीबाराचा सराव केला असून, आवश्यकता पडल्यास पिस्तूल वा बंदुकीचा वापर करण्यास पोलिस मागेपुढे पाहणार नाहीत, असा ‘संदेश’ गुन्हेगारी जगतात पाठविण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त, सहआयुक्त रस्त्यावर
पुणे पोलिस आठवडाभर ‘कोम्बिंग’ ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहेत. आयुक्त रितेशकुमार यांनी शुक्रवारी मध्यरात्री शहराच्या मध्यवस्तीतील पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या. सहआयुक्त संदीप कर्णिक येरवडा परिसरात लक्ष ठेवून होते. त्यानंतर दोघेही शिवाजीनगर पोलिस चौकीत एकत्र भेटले. त्यानंतर खडकी, स्वारगेट परिसरातही या दोघांनी भेटी दिल्याने इतर पोलिस अधिकारीही ‘दक्ष’ झाले होते.रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करण्यात येत आहे. शहरातील कोयता गँगसह छोट्या-मोठ्या भाईंची कुंडली गोळा करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देण्यात येत आहे.- संदीप कर्णिक, सहआयुक्त, पुणे पोलिसfrom Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7YSHWy9
No comments:
Post a Comment