म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराची वर्षभर वाट पाहून विस्तार तर झालाच नाही, उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मागून येऊन सरकारमध्ये थेट मंत्री झाल्याने शिवसेनेतील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. आपल्यामुळे राज्यात सत्ता मिळाली असताना आम्हालाच मंत्रिपदे मिळत नाहीत. त्यामुळे आम्हाला इतरांची मंत्रिपदे काढून द्या अशी मागणी शिवसेनेचे नाराज आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत असल्याचे समजते. साहजिकच नाराज आमदारांची समजूत काढण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आहे.अजित पवार यांचा महायुतीत प्रवेश झाल्यापासून शिंदे गटाच्या आमदारांची मोठी अडचण झाली आहे. सांगताही येईना-बोलताही येईना, अशी त्यांची अवस्था झाली आहे. या परिस्थितीत संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजीला मोकळी वाट करून दिली. आधी दोन पक्षांची युती झाली होती, राष्ट्रवादी काँग्रेस हा तिसरा पक्ष अचानक सत्तेत आला. तेव्हा त्यांनाही सत्तेचा वाटा देणे गरजेचे आहे. तो वाटा त्यांना दिलेला आहे; परंतु सत्तेचा वाटा त्यांना लगोलग दिल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. शेवटी सत्ता ही कशासाठी हवी असते तर लोकांची कामे करण्यासाठी, मग सत्तेत असूनही लोकांची कामे करण्यासाठी अडचणी येत असतील तर त्याचा काय उपयोग, असे ते म्हणाले.
निधीवाटपाचे काय?
राष्ट्रवादी आमच्यासोबत यायला नको होती, असे नाही. राष्ट्रवादी सोबत आल्याने आमची ताकद नक्कीच वाढली आहे. ही वाढलेली ताकद लोकसभेमध्ये नक्कीच दिसेल, येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसेल. शेवटी राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांनाही काहीतरी अपेक्षा असेलच की, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान, अजित पवार हे निधीवाटपात दुजाभाव करतात, असा आरोप करून सेना आमदारांनी ठाकरे यांची साथ सोडली. त्या आरोपांचे आता काय होणार, असा प्रश्न शिंदे यांच्या आमदारांना सतावत आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिंदे गटातील नेत्यांसह आमदारांच्या जुन्या वक्तव्यांचे व्हिडिओ व्हायरल करुन आणखी कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/b6CBNKV
No comments:
Post a Comment