म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सन २००५ मधील २६ जुलै रोजी मुंबई व परिसरात हाहाकार माजवणाऱ्या पावसाच्या कटू आठवणी कालच्या २६ जुलै रोजी कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांच्या मनात पुन्हा एकदा जाग्या झाल्या आणि सगळ्यांच्या मनात धडकी भरवून गेल्या. त्यात, बुधवारी रात्री आठ ते गुरुवारी दुपारपर्यंत मुंबई शहर व उपनगरांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देत भारतीय हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तसेच सर्व कॉलेजांना आज, गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईच्या उपनगरांत मंगळवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला होता. तो बुधवारी दिवसभर उपनगरांसह शहरांमध्येही होता. वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या २६ जुलैला पुन्हा एकदा सन २००५मधील २६ जुलैची आठवण मुंबईकरांना झाली. मुंबईमध्ये सकाळी १०नंतर पावसाचा जोर वाढला आणि दुपारनंतर काही सखल भागांमध्ये पाणी साचायलाही सुरुवात झाली. मुंबईमध्ये बुधवारी ऑरेंज अॅलर्ट दिला होता. या काळात तुरळक भागांमध्ये तीव्र मुसळधार सरींची शक्यता होती. मात्र पावसाचा जोर अधिक वाढत असल्याच्या जाणिवेतून यंदाही २००५प्रमाणे अनुभव घेण्याची वेळ येणार का, अशी भीतीही मुंबईकर व्यक्त करीत होते. मुंबईत दिवसभर अधूनमधून विश्रांती घेत पावसाची मुसळधार उपस्थिती होती. कुलाबा केंद्रावर सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या दरम्यान १२४.८ मिलीमीटर, तर सांताक्रूझ केंद्रावरही या १२ तासांमध्ये १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सायं. ५.३० पर्यंत सांताक्रूझ येथे ७८.९ मिलीमीटर पाऊस होता. त्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने भारतीय हवामान विभागाने गुरुवार सकाळी ८.३० पर्यंत रेड अॅलर्ट जारी केला. या दिवसभरच्या पावसामुळे सांताक्रूझ येथील एकूण पाऊस बुधवारी रात्री ८.३० पर्यंत दोन हजार मिलीमीटर पावसाचा टप्पा पार झाला. महिनाभरात १२० दिवसांचा पाऊस२५ जूनला मुंबईत दाखल झालेल्या मान्सूननंतर जेमतेम महिन्याभराच्या कालावधीमध्ये सांताक्रूझ येथे १२० दिवसांचा पाऊस पडला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज, गुरुवारी शहर, उपनगरांतील शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर केली. नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन पालिकेने केले आहे. येथेही अतिवृष्टीचा इशारा...रत्नागिरीमध्ये आज, गुरुवारी तुरळक ठिकाणी, तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. या अतिवृष्टीसोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाटही होऊ शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.सांताक्रूझ येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजता ८६.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या तुलनेत कुलाबा येथे पाऊस कमी होता. कुलाबा येथे ४४.६ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. बुधवारी दिवसभरात मात्र कुलाब्यासह मुंबई शहरामध्ये अधिक पाऊस होता. पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे येथे दुपारी १२नंतर तुरळक ठिकाणी ४० ते ७० मिलीमीटर दरम्यान पाऊस होता. बहुतांश ठिकाणी २० ते ४० मिलीमीटर पावसाची नोंद सायं. ५.३०पर्यंत झाली. मुंबई शहरात मात्र या उलट परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबई शहरामध्ये बहुतांश ठिकाणी ४० ते ७० मिलीमीटर दरम्यान पाऊस सायं. ५.३०पर्यंत नोंदला गेला. कुलाबा पम्पिंग स्टेशनमध्ये या काळात ६६ मिलीमीटरहून अधिक पाऊस नोंदला गेला. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत कुलाबा येथे १०३.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथे ७८.९ मिलीमीटर पाऊस पडला. एकूण हंगामातील सांताक्रूझ येथील पावसाची सरासरी गाठण्यासाठी बुधवारी संध्याकाळी केवळ ९८.४ मिलीमीटर पावसाची कमतरता होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HkDVuvQ
No comments:
Post a Comment