सातारा : माण तालुक्याच्या उत्तर भागात असणाऱ्या तोंडले- डांगेवाडी गावातील शिवानी श्रीमंत डांगे (वय १९) ही पोलीस भरतीच्या व्यायाम सरावासाठी जाते, असं घरी सांगून गेली. मात्र, ती पुन्हा घरी आलीच नसल्याने गावात एकच गोंधळ उडाला आहे. ती अचानक गेली कुठे? हा प्रश्न तिच्या घरातील व डांगे वस्तीवरील ग्रामस्थांना सतावत आहे. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.याबाबत माहिती अशी की, सध्या सर्वत्र पोलीस, सैन्य भरतीमुळे गावोगावी मुले-मुली अकॅडमीच्या माध्यमातून व्यायामाचा सराव करण्यात मग्न आहेत. ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती सर्वसामान्य आहे, त्या कुटुंबातील मुले स्वतः कसून सराव करून आपण कसे भरती होऊ शकतो हे नियोजन करत आहेत. त्याच पद्धतीने तोंडले येथील शिवानी डांगे ही दहिवडी येथील एका अकॅडमीमध्ये सराव करत होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस भरतीत तिने सहभाग घेतला होता. मात्र, तिची निवड न झाल्याने ती पुन्हा सरावाला लागली होती. डांगेवस्तीपासून चार किलोमीटर लांब असणाऱ्या मोगराळे येथील एका मठापर्यंत धावण्याचा सराव करण्यासाठी नियमितपणे पहाटे पाच वाजता घरातून निघायची. तिच्यासोबत मोगराळे येथील तिची एक मैत्रीणही असायची. या दोघी दोन तास व्यायाम करून सात वाजता घरी यायच्या. पण शुक्रवारी पहाटे नियमितपणे ती सरावाला जाते, अस सांगून गेली अन परत घरी आलीच नाही. त्यामुळे घरातील लोकांनी सरावाला जाणाऱ्या परिसरात तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यामुळे मुलीचा चुलत भाऊ विशाल किसन डांगे याने दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये अशी तक्रार दिली आहे. अंगामध्ये निळा शर्ट काळी पॅन्ट काळे बूट असा वेश आहे. कोणाच्या निदर्शनास आली, तर तात्काळ दहिवडी पोलीस ठाणेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. दहिवडी पोलीस तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QzBs7Sv
No comments:
Post a Comment